मांजराचा पाठलाग करताना बिबट्या ३० फुट खोल विहिरित पडल्याची घटना राजापूर तालुक्यातील नाणार शिंदेवाडी येथे घडली. दरम्यान विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुरक्षित बाहेर काढून राजापूर वनविभागाने त्याला जिवदान दिले. शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास नाणार शिंदेवाडी येथील रहिवासी कृष्णा पातले यांच्या घराशेजारील विहिरीमध्ये बिबट्या पडला असल्याची बाब पातले यांच्या निदर्शनास आली. याबातची माहीती त्यांनी नाणार ग्रामपंचायत सदस्य ओंकार रामकृष्ण पेडणेकर याना दिली श्री. पेडणेकर यांनी ही माहिती राजापूर वनविभागाला दिली. त्यानंतर राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे यानी याबबतची माहिती वनक्षेत्रपाल रत्नागिरी याना देत रेस्क्यु टिम घेऊनन घटनास्थळ गाठले.
वनविभागाच्या रेस्क्यु टिमने जागेवर जाऊन पाहणी केली असता भक्ष्य मांजराचा पाठलाग करत असताना बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसून आले. विहीर जवळपास ३० फूट खोल असून घेरी १५ फूट आहे. विहिरीचा काठ ठिसूळ असुन सतत माती व दगड पडत असल्याने विहिरीतून बिबट्याला बाहेर काढणे कठीण झाले होते. अखेर सर्व काळजी घेत व प्रयत्नांची पराकाष्टा करत वनविभागाने विहिरीमध्ये पिंजरा सोडला. मात्र विहिरीचा काठ ठिसुळ असल्याने बिबट्याला पिंजऱ्यात घेण्यात अडथळे येत होते. जवळपास अर्ध्या तासानंतर बिबट्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.
हा बिबट्या हा मादी जातीचा असून साधारण दिड वर्षाचा असल्याचे वनविभागाने पत्रकारांशी बोलताना सांगितले. बिबट्याची पशुसंवर्धन अधिकारी राजापूर यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून तो सुरक्षित असल्याची खात्री झाल्याने रत्नागिरीचे विभागीय वनाधिकारी दीपक खाडे व चिपळूण येथील सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली त्या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार, वनपाल राजापूर सदानंद घाडगे, विक्रम कुंभार वनरक्षक राजापूर, रेस्क्यु टीम राजापूरचे दीपक म्हादये, विजय म्हादये, नितेश गुरव, प्रथमेश म्हादये, निलेश म्हादये व ग्रामस्थ उपस्थित होते.