गर्दीचा फायदा घेवून रेल्वेप्रवासादरम्यान चोऱ्या करणाऱ्या संशयित आरोपीला रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने शिताफीने अटक केली आहे. दिनेशकुमार ओम प्रकाश (वय २७, रा. छर्पिया, पो. मुहुवार, रुधेलीखुर्द, जि. बस्ती, राज्य उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याने चोऱ्यांची कबुली दिल्याची माहिती कारवाई करणाऱ्या पोलीस पथकाने दिली आहे. गोव्यातील मडगाव येथून त्याला पकडण्यात यश मिळाले. गेल्या काही दिवसांपासून रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दागिने आणि अन्य साहित्य चोरीला जात होते. पोलीस त्याचा शोध घेत होते.
या संदर्भात १२ जून २०२३ रोजी एक गुन्हा रत्नागिरी शहर पोलीस स्थानक करण्यात आला होता. फिर्यादीनुसार संयशित आरोपीविरोधात भादविक ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. १५,४९९ रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. या चोरीचा तपास सुरु असताना राजापूर पोलीस स्थानकात ३० जून २०२३ रोजी अशाच प्रकारचा आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. या चोरीमध्ये एकूण २० हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनांखाली या चोऱ्या उघडकीस आणण्याचे प्रयत्न सुरु होते.
स्थानिक पोलीसांच्या मदतीला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस पथक समांतर तपास करत होते. मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार पोलिसांनी शोध घेतला. गोव्यामधील मडगाव येथील आरोपीला अटक करण्यात आली. दिनेशकुमार ओमप्रकाश असे या संशयित आरोपीचे नावे असून त्याने या दोन्ही चोऱ्या केल्याची कबूली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोन्ही चोऱ्यांमध्ये लांबविलेला १०० टक्के मुद्देमालदेखील पोलिसांनी जप्त केला आहे.
एकूण ६६९९ रुपयांचा ऐवज, – ४ मोबाईल हॅण्डसेट जप्त करण्यात आले आहेत. आरोपीने आणखी काही चोऱ्या केल्या असल्याची शक्यता वाटत असून त्या अनुषंगाने तपास सुरु आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे, पोलीस हवालदार विजय आंबेकर, पोलीस हवालदार सागर साळवी, पोलीस हवालदार योगेश नार्वे कर, पोलीस नाईक दत्तात्रय कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे या पोलीस पथकाने आरोपीला पकडण्यात महत्वाची भूमिका बजावली.