कोकणामध्ये येण्यासाठी विविध मार्गांमध्ये अनेक सौदर्य लाभलेले घाट लागतात. घाटातील सौदर्याचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक थांबून, फोटो काढून, शांत थंड वातावरणात थोडीशी तरी उसंत घेतात. घाटाचा तो वळणा वळणाचा रस्ता संपूच नये, बाजूला असलेली हिरवीगार वनराई, हवेतील गारवा, पर्यटकांसाठी असलेली रस्त्याच्या कडेला लहान मोठी दुकाने, अशी दृश्ये डोळ्यात साठवत घाट पार पडतो. रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरून जाताना साखरपा सोडल्यावर कोकण आणि पश्चिमेला जोडणारा आंबा घाट स्थित आहे. या घाटाच्या नामकरणासाठी देवरूखचे सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी मागणी केली आहे.
आपल्या निवेदनामध्ये त्यांनी सांगितले की, आंबा गावाचा आणि या घाटाचा तसा काहीसा जवळचा संबध नाही. कारण रत्नागिरी जिल्हा हद्द आंबा गावा आधीच समाप्त होते. असे असताना आंबा घाट हे नाव देणे, कसे योग्य आहे? सदरचा घाट हा दख्खन ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येतो आणि आंबा घाटाची जबाबदारी बांधकाम विभाग रत्नागिरी जिल्हा घेते. देवरूख पोलिस स्टेशन या क्षेत्रातील तपासकाम सांभाळते. रत्नागिरी जिल्ह्याची शान हा घाट असला तरी, हद्द नसलेल्या गावाच्या नावाने हा घाट प्रसिद्धीस कसा आला? या घाटाला गावच्या हद्दीच्या नावाप्रमाणे, दख्खनचा घाट असेच नामकरण करावे, असे मत आर्ते यांनी व्यक्त केले आहे.
समुद्रसपाटी पासुन सुमारे २ हजार फूट उंचीवर हा घाट सह्याद्री पर्वतरांगेमध्ये वसलेला आहे. पावसाळ्यामध्ये तर या घाटाचे सौंदर्य वाखाणण्याजोगे असते. निसर्गाची उधळण आपल्याला या घाटातून जाताना पाहता येते. येथील बारमाही पाणी वाहणारे गायमुख हे पर्यटकांसाठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे. अनेक जण तेथून पुढील प्रवासासाठी पाणी भरून नेतात.