मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या ४० आमदारांनी त्यांना पाठिंबा दिल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पायउतार व्हाव लागलं आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर सुमारे १२ खासदारांनी सुद्धा शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे.
आदित्य ठाकरे सेनेला बसलेला जबरदस्त फटका आणि पक्षाच झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी महाराष्ट्रभर दौऱ्यावर आहेत. ते बंडखोर आमदारांच्या मतदारसंघाला देखील भेटी देत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांची निष्ठा यात्रा निघणार आहे. मात्र या निष्ठा यात्रे दरम्यान आदित्य यांची सावंतवाडीतील गवळी तिठ्यावरून रॅली निघणार होती. परंतु, या यात्रेदरम्यान मधी बंडखोर नेते केसरकर यांचे घर असल्याने, येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने रॅलीला परवानगी नाकारली आहे. यामुळे शिवसेनेला केसरकरांच्या घरासमोर जाऊन कोणत्याही प्रकारे शक्तीप्रदर्शन करता येणार नाही आहे.
आता ही रॅली गवळी तिठ्या ऐवजी चिटणीस नाका ते गांधी चौक अशी नियोजित आहे. आदित्य यांच्या निष्ठा यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, उद्यापासून दुसरा टप्पाला सुरूवात होणार आहे. यामध्ये ते प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असून, उद्या सकाळी साडे अकरा वाजता कुडाळ येथे आदित्य यांची निष्ठा यात्रा होईल. त्यानंतर सावंतवाडी येथे मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते असलेल्या केसरकरांच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून निष्ठा यात्रा येणार असल्यामुळे शिवसैनिक चांगलेच कामाला लागले आहे. शिंदेनी बंडखोरी केल्यानंतर केसरकर हे सातत्याने शिंदे गटाची बाजू माध्यमांसमोर मांडत असून शिवसेनेच्या टीकेला उत्तरही देत आहेत. यामुळे शिवसैनिकांमध्ये त्यांच्याबद्दल रोष निर्माण झाला आहे. नेमक याचमुळे काही गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी त्या मार्गाने रॅलीला परवानगी नाकारली.