शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर प्रथमच शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे संवाद निष्ठायात्रेच्या निमित्ताने रत्नागिरी दौऱ्यावर आले आहेत. रत्नागिरी, चिपळूण आणि दापोलीत त्यांची सभा होणार आहे. रत्नागिरीतील सभा भव्य करण्याचा चंग सेनेने बांधला आहे. त्यासाठी रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांतून सुमारे १५ हजार कार्यकर्ते दाखल होतील, असा दावा सेनेचे उपनेते राजन साळवी यांनी केला आहे. साळवी स्टॉप येथील जलतरण तलावासमोर ही सभा होणार आहे.
त्यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांवर गट, गणनिहाय कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी दिली आहे. या दौऱ्या निमित्ताने आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठमोठे बॅनर झळकले आहेत; परंतु त्यापैकी काही बॅनरवरून राजकीय चर्चेला जोरदार उधाण आले आहे. शहराच्या प्रवेशद्वाराजवळ सेनेकडून त्यापैकी एक बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर असणाऱ्या शिंदे समर्थकांच्या फोटोमुळे चर्चांना उधाण आले. हा बॅनर सेनेकडूनच लावण्यात आल्याचा खुलासा तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी केला आहे. या बॅनरवर रोशन फाळके, विकास सावंत, वसंत पाटील, विकास पाटील, जितू शेट्ये आणि नायर यांचे फोटो आहेत; मात्र हे सर्वजण उदय सामंत समर्थक असल्याचा दावा रोशन फाळके यांनी केला आहे.
याही पेक्षा धक्कादायक म्हणजे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्वागत बॅनर लावताना त्यामध्ये गंभीर चूक केल्याचे निदर्शनास आले. सध्या गाजत असलेले आणि पत्नीच्या खुनाचा गंभीर आरोप असल्याचे प्रकरण ताजे असतानाही सेनेचे रत्नागिरी उपतालुकाप्रमुख सुकांत ऊर्फ भाई सावंत यांचा फोटो या स्वागत बॅनरवर लावल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चाना उधाण आले. शिवसेना अडचणीत येण्याच्या शक्यतेने अखेर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुकांत ऊर्फ भाई सावंत यांचा बॅनरवरील फोटो हटविला. त्या जागी अन्य पदाधिकाऱ्याचा फोटो चिकटवण्यात आला आहे.