तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्यांमधून वायू गळतीने पावसाळ्यात झाडे करपून जात आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागतोय. त्याशिवाय गॅस लागून नागरिक बेशुद्ध पडत असल्याने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. अशा स्वरूपाच्या गंभीर प्रश्नांमुळे स्थानिक पुढाऱ्यांची ठेकेदारी वाढीस लागली असून, सर्वसामान्य नागरिक मात्र, हवालदिल झालेले आहेत. रासायनिक कारखान्यातून पावसाच्या पाण्यात रसायन मिश्रित करून ती पऱ्यावाटे नदीला सोडली जातात. हा सर्वात प्रदूषणकारी प्रकार अगदी उघडपणे लोटे औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये चालू आहे. असे असताना लोटे वसाहतीमधील कारखान्यांमध्ये मोठमोठे स्फोटही होत आहेत. वायू गळतीचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे.
सल्फर डायऑक्साईड यासारखा घातक वायू कारखान्यातून बाहेर पडला व तो नागरी वस्तीत गेला तर, त्यामुळे परिसरातील उगवलेले गवत झाडेझुडुपेही जळून खाक होत आहेत. या प्रकाराचा सर्वाधिक फटका गुणदे तलारीवाडी, लोटे चाळकेवाडी आणि इतर भागातील नागरिकांना सध्या तरी बसलेला आहे. अशा स्वरूपाची वायुगळती सातत्याने वसाहतीतील कारखान्यांम धून होत असते. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार दाखल होईपर्यंत, हे वायूचे झालेले प्रदूषण मोकळ्या हवामानात मिसळून जाते आणि त्या वायूची तीव्रता तोपर्यंत कमी झालेली असते.
वायू प्रदूषणाचा सर्वाधिक फटका हा श्वसन विकारावर होत असतो. श्वसनाचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतो व हे गंभीर प्रकार दिवसागणित वाढत आहेत. ज्या कारखान्यातून वायूसह रसायन मिश्रित पाण्याचे प्रदूषण होते त्या कारखानदारांच्या व्यवस्थापकांना त्या त्यावेळी स्थानिक पुढारी वेठीस धरतात. त्यानंतर कारखान्यातील कामगार पुरवणे, कच्चा मालाचा पुरवठा करणे, आवश्यक उत्पादित मालाची विक्री करणे, आवश्यक विक्रीचे टेंडर, नवीन कारखान्यांची उभारणी अशी विविध कामे ठेकेदारी पद्धतीने पुढाऱ्यांना बक्षीस स्वरूपात कारखानदार देत असतात. त्यानंतर स्थानिक प्रदूषणाचा तडाखा कमी होईल, याची कुठलीही शाश्वती मिळू शकत नाही.