केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व प्रकारच्या योजना किंवा सेवांचा लाभ घेण्यासाठी आता एकच डिजिटल प्रोफाइल तयार करण्यात येणार आहे. सरकार सर्व सरकारी सेवांसाठी पोर्टल आणि अॅप आणणार आहे. ही प्रक्रिया या ऑगस्ट २०२२ पासून सुरू केली जाणार आहे. या पोर्टलला ‘सिंगल साइन ऑन’ असे नाव देण्यात आले आहे.
यामध्ये एकाच प्रोफाईल आयडीद्वारे सर्व प्रकारच्या सरकारी सेवा आणि योजनांचा लाभ घेता येणार आहे. म्हणजे आता वारंवार पडताळणीच्या प्रक्रियेतून जावे लागणार नाही. यानंतर वेगवेगळ्या सेवा आणि योजनांना जोडण्यासाठी लॉगिन आयडी-पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज राहणार नाही.
केंद्र सरकार प्रत्येक नागरिकाची राष्ट्रीय डिजिटल प्रोफाईल तयार करत आहे. यामुळे आता कोणत्याही सरकारी प्रकिया किंवा योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वेळी फॉर्म भरा अथवा कागदपत्रे जमा करणे, ती प्रत्यक्ष दाखवावी लागणार नाहीत. प्रत्येक वेळी आयडी, पासवर्ड, पॅन, बँक खाते, टीआयएन, टॅन, जीएसटीएन, आरटीओ, विमा क्रमांक लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही.
राष्ट्रीय सिंगल साईन-ऑन पोर्टलवर सर्व सरकारी सेवा केंद्र आणि राज्य सेवांमध्ये एकत्रित केल्या जातील. या पोर्टलच्या आधारे शाळा, महाविद्यालयातील प्रवेश, शैक्षणिक प्रमाणपत्रे, रेल्वे व विमान तिकीट घेणे, , वीज, पाणी बिले जमा करणे घरपट्टी भरणे, आयकर परतावा, जीएसटी रिटर्न दाखल करणे, व्यवसायाला परवानगिशी संबंधित विविध सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना व सुविधांच्या एकत्रीकरणासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाने हे पोर्टल/अॅप तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. या पोर्टलवर एकदा साइन इन करावे लागेल. नंतर युजर ऑथेंटिकेशन म्हणजेच पडताळणी होईल. त्यानंतर कायम या एकाच आयडीद्वारे कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे.