शहरात सध्या भूमिगत केबलद्वारे अनेक ठिकाणी वीजपुरवठा करण्यात आला आहे; परंतु केबलच्या निकृष्ट कामांमुळे रविवारपासून सोमवारी दुपारपर्यंत शहरातील मच्छी मार्केट, झारणी रोड या परिसरांतील वीजपुरवठा खंडित झालेला होता. त्यामुळे नागरिकांना १६ तास त्रास सहन करावा लागला; मात्र महावितरणच्या पथकाने त्या परिसरात ओव्हरहेड वायर टाकून या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत केला. रत्नागिरी शहर परिसरात अनेक भागात भूमिगत वीज वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा सुरू आहे; पण अनेक ठिकाणी काही डीपी हे गटारावर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे गटारामधून येणारे उंदीर, घुशी यांनी डीपीमध्ये शिरकाव केला, असे स्थानिक नागरिकांचे मत आहे. त्यामुळे वारंवार वीज जाण्याचे प्रकार सुरू आहेत. भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने मागील काही दिवस वीज खंडित होण्याच्या प्रकारावर उपाययोजना करण्याचे प्रयत्न केले; परंतु त्याला यश आले नाही. रत्नागिरी शहरातील मच्छी मार्केट, झारणी रोड परिसरात असणाऱ्या रोहित्राच्या खोक्यामधून मोठ्या प्रमाणात कचरा महावितरण कर्मचाऱ्यांनी बाहेर काढून स्वच्छता केली.
महावितरणच्या कामामुळे रत्नागिरी शहर परिसरात अनेक ठिकाणी वीज सातत्याने गायब होत होती. त्यामुळे मोठा गोंधळ उडत होता. मच्छी मार्केट, झारणी रोड येथे रविवारी (ता. २२) रात्री सव्वानऊच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. काही परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा सुरू होता. रात्री गेलेली वीज सोमवारी दुपारी तीन वाजल्यानंतर सुरळीत करण्यात महावितरणच्या कार्मचाऱ्यांना यश आले. सोमवारी सकाळपासून दुपारपर्यंत सुमारे पाच ते सहा तास राबून त्या भागातील महावितरणच्या पथकाने दुरुस्तीचे काम पूर्ण केले. या भागाततील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांची भूमिगत वाहिन्यांतील बिघाड शोधण्यासाठी मोठी धावपळ उडाली. हा बिघाड समोर आल्यावर त्यासाठी खोदाई करावी लागणार होती. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता.
भूमिगत वीज वाहिन्यांची दुरुस्ती – महावितरणचे अभियंता कुंभार आणि त्यांच्या सात ते आठ कर्मचाऱ्यांच्या पथकाने त्यावर मार्ग म्हणून ओव्हरहेड वायर टाकून या भागातील वीजपुरवठा सुरळीत केला. भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामातील चुका महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुरुस्त कराव्या लागत आहेत.