26.1 C
Ratnagiri
Saturday, February 22, 2025

आता वेध रविवारच्या सामन्याचे, चॅम्पियन्स करंडक

बांगलादेशला हरवून विजयी सलामी दिली असली तरी...

कामगिरी नियुक्तीने शाळांवर जाणार नाही, कंत्राटी शिक्षक संघटना

पुढील वर्षात कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीबाबत हमी दिली...

प्रधानमंत्री घरकुलाचे १९ हजार ५२५ चे उद्दिष्ट – कीर्तीकिरण पूजार

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्याला १९...
HomeSindhudurgआजपासून आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाला प्रारंभ

आजपासून आंगणेवाडीच्या यात्रोत्सवाला प्रारंभ

भाविकांच्या सेवेसाठी आंगणे कुटुंबीय व जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे.

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा यात्रोत्सव उद्या दि. २२ फेब्रुवारी रोजी होत असून भराडी मातेच्या दर्शनासाठी भाविक आतूर झाले असून भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडी सज्ज झाली आहे. पहाटे ३ वाजल्यापासून दर्शन सुरु होणार असून भाविकांना सुलभपणे दर्शन घेता यावे यासाठी दहा रांगांची सोय करण्यात आली आहे. भाविकांच्या सेवेसाठी आंगणे कुटुंबीय व जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. आंगणेवाडीत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लाखो भाविकांची रेकॉर्डब्रेक अशी गर्दी उसळणार असून भराडी मातेच्या दर्शनासाठी विविध पक्षांचे राजकीय नेते, खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक येणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही आंगणेवाडीत ठेवण्यात आली आहे. आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा महिमा सर्वदूर पसरला असून देवीच्या यात्रेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. यात्रेसाठी आंगणे ग्रामस्थ मंडळ आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने चोख नियोजन व तयारी करण्यात आली आहे. देवीच्या दर्शनासाठी १० रांगांची सोय करण्यात आली आहे. यात्रोत्सवात ओट्या भरण्यास पहाटे तीन वाजता प्रारंभ होणार आहे. ओट्या भरण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन आंगणे कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

शनिवारी रात्री ९.३० ते १२ या वेळेत धार्मिक विधीसाठी भाविकांच्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी संयम व शिस्त बाळगून देवीचे दर्शन रांगेतूनच घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सचिव काका आंगणे यांनी केले आहे. भराडी मंदिराच्या सभामंडप व गाभाऱ्याला रेशमी कापडी पडदे, विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईने लेझर लाइटिंग करण्यात आली असून रात्रीच्या वेळी मंदिर रोषणाईत न्हाऊन निघत आहे. तसेच मंदिराच्या बाहेरील परिसरातही आकर्षण विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेत येणाऱ्या महनीय व्यक्तींसाठी मुख्य स्वागत कक्षालगतच खास व्यवस्था करण्यात आली आहे. आंगणेवाडी यात्रेसाठी मालवण, कणकवली, मसुरे व कांदळगाव मार्गे भाविक आंगणेवाडीत दाखल होणार आहेत. आंगणेवाडीत मालवण मार्ग व कणकवली म ार्गावर एसटी बस आणि भाविकांच्या खासगी गाड्या, मोटरसायकल यासाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

मालवण एसटी आगाराच्यावतीने १२० यात्रा स्पेशल गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेत दोन दिवस वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी वीज वितरण कंपनीनेही अखंडित वीज पुरवठ्यासाठी खबरदारी घेतली आहे. वीज वितरण कंपनीकडून हंगामी व्यापाऱ्यांना तात्पुरते ‘वीज कनेक्शन देण्यात आले आहे. तर आरोग्य विभागाच्यावतीनेही दक्षता घेण्यात आली असून यात्रेत भाविकांच्या सेवेसाठी आरोग्य कर्मचारी, रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या आहेत. तर जिल्ह्यातील चार नगरपालिकांचे अग्निशमन बंब व कर्मचारीही सज्ज राहणार आहेत. आंगणेवाडीत विविध हंगामी व्यापाऱ्यांनी, फिरत्या विक्रेत्यांनी आपली दुकानें थाटली आहेत. आकाशपाळणा, मौत कां कुआ यासारखे खेळ थाटण्यांत आले आहेत. तसेच खेळणी, कपडे, भांडी, हत्यारे, सजावटीच्या वस्तू यांची दुकानें मांडण्यात आली आहेत. तर विविध खाद्य पदार्थांची हॉटेल्स व मालवणी खाजासह इतर मिठाईची दुकानेही थाटली आहेत. यामुळे सारी आंगणेवाडी नगरी फुलून गेली आहे.

यात्रेवर पोलिसांची करडी नजर – आंगणेवाडी यात्रेत सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करीता सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे वतीने बंदोबस्तकरीता ६ पोलीस उपअधीक्षक, १३ पोलीस निरीक्षक, ३२ स.पो.नि/पो.नि., ५०० पोलीस अंमलदार, २ दंगल नियंत्रण पथक, १५० होमगार्ड, तसेच घातपात विरोधी पथक नेमण्यात आलेले आहे. तसेच यात्रेतील भाविकांचे सुरक्षेकरीता यात्रा परिसरात ५० सीसीटीव्ही कॅमेरे, १० व्हिडीओ शुटीग कैमेरे व ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने संपूर्ण यात्रा परिसराची निगराणी करण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दीवर लक्ष व नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. यात्रेत कोणताही गैर प्रकार घडू नये, टेहळणी टॉवर, साध्या वेशातील महिला व पुरुष पोलीस कर्मचारी यांची पथके यात्रेवर लक्ष ठेवून असणार आहेत. तसेच महत्वाच्या ठिकाणी पोलीसांकडून पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. गर्दीत वावरत असताना खिसेकापू चोरांपासून सावधान रहावे, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींनी शक्यतो गर्दीत वावरणे टाळावे, कोणतीही संशयास्पद गोष्ट अथवा व्यक्ती निदर्शनास आल्यास तसेच मदतीसाठी ११२ नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे. पार्किंग व्यवस्थे व्यतिरिक्त अन्य ठिकाणी वाहने पार्किंग केल्यास पोलीसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. यात्रा भक्तिमय वातावरणात व सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले आहे.

भाजपचा स्वागत कक्षात करून मिळणार आधार कार्ड व इतर कागदपत्रे अपडेट – आंगणेवाडी श्री भराडी मातेवर जशी लाखो भाविकांची श्रद्धा आहे तशी भाजपा नेते, कार्यकर्त्यांची अपार श्रद्धा आहे. दोन वर्षांपूर्वी आंगणेवाडी यात्रेत भाजपचा भव्य मेळावा देवीच्या कृपेनें संपन्न झाला. त्यानंतर २०२४, च्या निवडणुकीत भाजपला मोठा जनाधार मि ळाला. पहिल्यांदाच भाजपचे खासदार नारायण राणे विजयी झाले. त्याच पाठोपाठ विधानसभेत महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. मालवण कुडाळ मध्ये दहा वर्षांनी महायुतीचे आमदार निलेश राणे विजयी झाले. पदवीधर, शिक्षक निवडणुकीतही यश मिळाले. त्यामुळे विजयाची ही घोडदौड आई भराडीच्या कृपेने यापुढेही कायम राहील. अशी भावना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आंगणेवाडी येथे बोलताना व्यक्त केली. दरम्यान, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली गेली पंधरा वर्षे आंगणेवाडीत स्वागत कक्ष सुरू आहे. तो असाच सुरू राहणार आहे. गतवर्षी प्रमाणे या स्वागत कक्षात सर्व सामान्यांना आवश्यक असणारे विविध प्रकारचे दाखले, आधार कार्ड नोंदणी, अपडेट सेवा उपलब्ध करून दिले जाणारं आहेत असे प्रभाकर सावंत यांनी सांगितले.

राष्ट्रीय काँग्रेसचा भाविकांसाठी स्वागत कक्ष – आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या निमित्ताने आंगणेवाडी येथे राष्ट्रीय काँग्रेसतर्फे स्वागत कक्ष उभारण्यात आला असून त्याचे उदघाटन काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, जिल्हा सरचिटणीस अरबिंद मोंडकर, देवानंद लुडबे, मधुकर परब, बाबा मेंडीस, सौ. अमृता मोंडकर व इतर उपस्थित होते

बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्येक्रमाचा शुभारंभ – आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथील बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आंगणेवाडी येथे आला. या शुभारंभ सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँक मकरंद देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी जि प सिंधुदुर्ग, श्रीमती रश्मी दराद मुख्य महाप्रबंधक नाबार्ड प्रादेशिक कार्यालय पुणे, मिलिंदसेन भालेराव विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग, बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर, बँकेचे संचालक संदीप परब, व्हीक्टर डान्टस, मेघनाथ धुरी, जिल्हा प्रबंधक नाबार्ड श्रीम. दिपाली माळी, सतीश आंगणे अध्यक्ष आंगणेवाडी विकास समिती, नितीन काळे जिल्हा समन्वयक अधिकारी (मावीम), वैभव पवार व्यवस्थापक जिल्हा अभियान व्यवस्थापक (उमेद) जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, आदि मान्यवर उपस्थित होते. सदर बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री दि. २१ फेब्रु. ते दि. २४ फेब्रु. २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular