गेल्या दोन आठवड्यापासून मुंबईतील आझाद मैदानावर सूरू असलेल्या एसटी संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. कारण परीवहन मंत्री अनिल परब यांची संध्याकाळी ६ वाजता पत्रकार परिषद घेत मोठी निर्णायक घोषणा करणार असल्याचे समजते. त्यामुळे संध्याकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे आता सगळ्यांचे लक्ष लागुन राहिले आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो एसटी कर्मचारी मागील १५ दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी बेमुदत संप घोषित करून ठाण मांडून बसले आहेत. अशावेळी काल पडळकर, खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची अनिल परब यांच्यासमवेत बैठक झाली.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने कर्मचाऱ्यांसमोर एक नवा पर्याय ठेवण्यात आला आहे. राज्य सरकारकडून अंतरिम वेतनवाढीचा एक प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मान्य करून कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन लगेच कामावर रुजू व्हावे, अशी विनंती परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे.
एसटीचं शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याची कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. याबाबत हायकोर्टाच्या आदेशाने समिती नेमण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढचा निर्णय घेता येणार आहे. त्याशिवाय एका दोघाने घेण्यासारखा हा निर्णय नाही आहे असे निदर्शनास आणून दिल्यावर, परब यांनी अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव शिष्टमंडळापुढे ठेवला. या बैठकीमध्ये पगारवाढीवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर आता हा प्रस्ताव घेऊन अनिल परब हे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पोहोचले आहेत. त्यानंतर आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन परब पगारवाढीच्या निर्णयाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली असून, एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता लवकरच मिटण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.