शिक्षकांची कमतरता असल्याने जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक अवस्था यंदाच्या वर्षी बिकट होणार आहे. गुणवत्तेत राज्यात असलेली पत कायम ठेवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेने शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक नेमावेत, अशी मागणी माजी शिक्षण सभापती दीपक नागले यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. रत्नागिरी जिल्हा डोंगराळ असून, असंख्य वाड्यावस्त्यांमध्ये विखुरलेला आहे. अनेक वाड्यावस्त्यांपर्यंत जाण्यासाठी धड रस्तेही नाहीत. या भागातील मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हापरिषदेमार्फत वाडी तिथे शाळा सुरू करण्यात आली.
यामुळे गावातच शिक्षणाची सोय झाली. सध्या या ग्रामीण भागातील शाळाची अवस्था चिंताजनक आहे. गेली काही वर्षांत अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. गेली अनेक वर्ष शिक्षक भरतीच झालेली नाही. केवळ दहा टक्के जागा रिक्त ठेवण्याचा नियम असतानाही त्याला बगल देऊन सुमारे सातशे शिक्षकांना जिल्हा बदलीने मुक्त करण्यात आली. रिक्ततेचे प्रमाण २५ टक्क्यांहून अधिक आहे. अनेक शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत जिल्ह्यातील मुलांच्या शिक्षणाची आबाळ होत आहे, ही बाब भूषणावह नाही.
राज्यभरात शिक्षक भरतीच होणार नसली, तर डोंगराळ दुर्गम असलेल्या जिल्ह्यातील वाडीवस्तीवरच्या गोरगरीब मुलांच्या भवितव्याचा विचार करून तात्पुरती शिक्षक भरती का करण्यात येऊ नये असा प्रश्न ग्रामस्थ आणि पालकांमधून विचारला जात आहे. २० पटांपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांवर सेवानिवृत्त शिक्षकांची विशिष्ट मानधनावर नेमणूक करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली होती. जिल्ह्यातील प्रशिक्षित युवकांमधूनच शिक्षक भरती करून वाडी-वस्तीवरील दुर्गम भागांतील मुलांच्या शिक्षणाची परवड थांबवणे गरजेचे आहे.