राज्यभरात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने बीडसह मराठवाड्यात आक्रमक रूप धारण केले आहे. ठिकठिकाणी जाळपोळ सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून झाले आहेत. काल रात्री दहा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे-पाटील गेले सहा दिवस उपोषणाला बसले आहेत. त्यांची खालावलेली परिस्थिती आणि शासनाकडून अपेक्षित निर्णय न झाल्यामुळे राज्यभरात मराठा आरक्षणावरून अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू झाली आहे.
एसटीच्या गाड्यांची तोडफोड सुरू आहे. बीडसह मराठवाड्यात जाळपोळ सुरू केली आहे. हळूहळू हे लोण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात येण्याच्या शक्यतेने रत्नागिरी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. रत्नागिरी पोलिस अलर्ट मोडवर आले असून, काल (ता. ३०) रात्री १० वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मराठा समाजाकडून कोणतेही आंदोलन झाल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याच्यादृष्टीने किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसदलाने ही दक्षता घेतली आहे. बंदोबस्तामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केलेले असताना आक्रमक झालेल्या मराठा समाजबांधवांनी लोकप्रतिनिधींच्या घरांसह शासकीय कार्यालयांना लक्ष्य करत आहेत. दगडफेक करत जाळपोळ सुरू केली आहे. ठिकठिकाणी रास्ता रोको, रेल्वे रोको केले जात आहे. राज्यात मराठा आरक्षणामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिस सतर्क झाले आहेत.