यंदा हापूस काढणीयोग्य होण्याचा कालावधी उष्म्यामुळे कमी राहिल्याने एप्रिलमध्ये उत्पादन अधिक आले आहे. परिणामी, बाजारात आंबा पेठ्यांची आवक वाढली होती. कालांतराने मे महिन्याच्या पहिल्या टप्प्यात बागायतदारांकडील माल कमी झाल्यामुळे अक्षय तृतीयेलाही वाशी बाजारात ५० हजार पेट्याच दाखल झाल्या. सध्या बाजारातील पाच डझनच्या पेटीचा दर ३ हजार रुपयांपर्यंत स्थिर आहे. खासगी विक्री करणाऱ्यांना त्यापेक्षा अधिक दरही मिळत आहे तसेच कर्नाटकी आंबाही मोठ्या प्रमाणात बाजारात येऊ लागल्याने हापूसच्या दरावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यंदा वातावरणामधील उष्म्याचे प्रमाण अधिक जाणवत आहे. पारा ३८ अंशांपर्यंत गेलेला होता. कोकणातील कातळावरील बागांमध्ये पारा ४० अंशापर्यंतही नोंदल्याचे बागायतदार सांगत आहेत. वाढत्या उन्हाचा परिणाम हापूसवर दिसत आहे.
दरवर्षी अक्षय तृतीयेला ७० हजारांहून अधिक पेट्या कोकणातून वाशी बाजारात दाखल होतात; मात्र यंदा ते प्रमाण कमीच राहिलेले आहे. एप्रिलमध्ये वाशी बाजारात एकाचवेळा आंबा बाजारात आल्याने हापूसचे दर एक ते दीड हजार रुपयांनी घसरले होते. पुढे परदेशी निर्यात सुरू झाल्याने वाशीत येणाऱ्या आंब्याला मागणी वाढली तसेच एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात दररोज ६८ ते ७० हजार पेट्यांची नोंद होत होती. त्याच पेट्या मेच्या सुरुवातीला ५० हजारांवर आल्या आहेत. माल कमी मिळू लागल्याने हापूसचे दर स्थिर आहेत. दर्जेदार पाच डझनच्या पेटीला ३ हजार, तर त्यापेक्षा कमी १५०० रुपये दर मिळत आहे.
हे दर पुढील आठवड्यात आणखीन खाली येण्याची शक्यता आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे यावर्षी आंबा तयार होण्याचा कालावधी ७५ वरून ५७ ते ५८ दिवसांवर आला आहे. त्यामुळे एकाचवेळी आंबा तयार झाला. परिणामी, यावर्षी १५ मेपर्यंत हापूसचा हंगाम राहील, असा बागायतदारांचा अंदाज आहे; मात्र दहा टक्क्यांहून अधिक आंबा बागायतदारांकडे यावर्षी कमी उत्पादन आले होते.
उष्मावाढीचा फळावर परिणाम – हंगामाविषयी आंबा बागायतदार सलील दामले म्हणाले, वातावरणातील बदलांचा परिणाम हापूसवर होत आहे; मात्र बागायतदारांकडूनही संप्रेरकांचा अतिवापर कारणीभूत ठरत आहे. उष्मा वाढल्याने आंबा काढणीयोग्य होण्याचा कालावधी कमी झाला आहे तसेच १८० ते २०० ग्रॅमच्या फळामध्ये साका आढळण्याचे प्रमाण २५ टक्केवर आहे.