मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. कोदवली बस स्टॉपवरून लिफ्ट मागणाऱ्या महिलेला कारमध्ये बसवून तिला राजापुरात न उतरता पुढे नेत तिला दाखवलेल्या धाडसामुळे ती बचावली आहे. दरम्यान या झटापटीत कारचालकाने या महिलेच्या डोक्यात रॉड घातल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिला अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे. दरम्यान कालचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गुरूवारी झालेल्या या घटनेनंतर राजापुरात खळबळ उडाली आहे. अधिक वृत्त असे की, कोदवली येथे राहणाऱ्या रश्मी चव्हाण या गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान कोदवली येथून राजापूरला जाण्यासाठी कोदवली बस स्टॉपवर उभ्या होत्या. त्यांनी मुंबईकडून येणाऱ्या एका कारला हात दाखवला. कार चालकाने त्यांना लिफ्ट दिली. मात्र कार चालकाने त्यांना राजापुरात न उतरता तो त्यांना पुढे घेऊन जाऊ लागला. यावेळी आपल्यासोबत काहीतरी अघटीत घडतेय, याची कल्पना चव्हाण यांना आली. त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला.
कारमधून उडी मारली – त्याचवेळी या कार चालकाने त्यांच्या गळ्यातील दागिने काढण्याचा प्रयत्न केला. चव्हाण यांनी जोरदार प्रतिकार केला. दरम्यान महामार्गावरील मोठ्या पुलाच्या पुढील रस्त्यावर त्यांनी गाडीतून दरवाजा उघडून उडी मारली. दरम्यान त्यांच्यामध्ये गाडीत झालेल्या झटापटीत कार चालकाने त्यांच्या डोक्यात रॉड मारल्याचे त्यांनी सांगितले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. चव्हाण यांनी गाडीतून उडी मारल्यानंतर हा कारचालक पुन्हा गाडी मागे वळवून मुंबईच्या दिशेने फरार झाला आहे. चव्हाण यांची पर्स व मोबाईल गायब आहे.
रिक्षाचालक मदतीला आले – गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या चव्हाण यांच्या मदतीला रिक्षाचालक धावून आले. स्थानिक रिक्षाचालक व ग्रामस्थांनी त्यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरीला हलविण्यात आले आहे. या प्रकरणी तात्काळ राजापूर पोलिसांनी दखल घेतली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलीस तपास सुरू – महामार्गावरील पेट्रोल पंप तसेच अन्य ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. दरम्यान ही व्हॅगनार कार असल्याची माहिती पुढे आली असून पोलीस अधिक तपास करत आहे. दरम्यान महामार्गावर भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून प्रवासी व खास करून महिलांमध्ये घबराट पसरली आहे.