दिव्यांगांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने दिव्यांग जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम ाला संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांनी हजेरी लावली. कार्यक्रमात दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेत त्यांची निवेदने स्विकारण्यात आली. यावेळी बच्चुभाऊ कडू यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील विविध संघटनांमध्ये विभागलेल्या दिव्यांगांनी एकत्र येऊन प्रहारच्या माध्यमातून संघर्ष करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरी दिव्यांग समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रहार संघटनेत अधिकृत प्रवेश केला.
बच्चुभाऊंचे दिव्यांग महिलांकडून औक्षण – या कार्यक्रमात अति तीव्र दिव्यांग महिलांनी बच्चुभाऊ कडू यांचे औक्षण करून त्यांना सन्मानित केले. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत दिव्यांग बांधवांसाठी झटणाऱ्या त्यांच्या अथक प्रयत्नांची प्रशंसा करण्यात आली.
महत्त्वाच्या नियुक्त्या व जबाबदाऱ्या – यावेळी प्रहार संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव आणि कोकण विभाग अध्यक्ष सुरेश कोकणे यांच्या उपस्थितीत, आनंदकुमार लल्लन त्रिपाठी यांची प्रहार रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच शैलेश पोस्टुरे यांची रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली.
अंमलबजावणी गरजेची – बच्चुभाऊ कडू यांनी आपल्या भाषणात आत्तापर्यंत २०० हून अधिक शासन निर्णय पारित करून घेतल्याचे सांगत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. तसेच ग्रामपंचायतीपासून नगरपालिकांपर्यंत प्रत्येक ठिकाणी दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी निश्चित केला जावा, अशी ठाम मागणी केली.
दिव्यांगांसाठी संघटित लढा – या कार्यक्रमात उपस्थित दिव्यांग बांधवांनी आपले प्रश्न मांडले व संघटित होऊन न्याय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेच्या भावी योजनांवर चर्चा झाली व आगामी काळात दिव्यांगांच्या हक्कांसाठी अधिक तीव्र लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. हा दिव्यांग जनता दरबार दिव्यांगांच्या हक्कांसाठी प्रभावी व्यासपीठ ठरला असून, रत्नागिरीतील दिव्यांग बांधवांना संघटित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.