शहरातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्याचे पॅचवर्क पुरते खड्ड्यात गेले आहेत. यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्याने थोडा दिलासा मिळाला असला तरी अंतर्गत रस्त्यांची वाताहत झाली आहे. ‘सकाळ’ने शहरातील हे विदारक चित्र मांडल्यानंतर पालिकेने आज शहरातील खड्डे भरण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी म्हणून डबर टाकले जात आहे; परंतु पाऊस येऊन गेला की, त्याचे लाल पाणी होऊन पुन्हा ये रे माझ्या मागल्याची स्थिती होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पावसाचा विचार करूनच दर्जेदार रस्ते करणे, हाच यावरील रामबाण उपाय आहे. रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दरवर्षी पावसाळ्यात चर्चा होते. कारण, हे रस्ते प्रत्येक पावसामध्ये खड्ड्यात जातात. मग या रस्त्यांच्या दर्जाबाबत पालिका प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी का विचार करत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतो. जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार मिमी पावसाची दरवर्षी नोंद होते तर मग त्याचा विचार करून रस्त्यांची निर्मिती का केली जात नाही ?
दरवर्षी नवीन रस्ते आणि दरवर्षी रस्त्यांना खड्डे आणि ते बुजवण्यासाठी वाया जाणार पैसा, याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. शहरात आज सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून सहा काँक्रिटचे रस्ते निर्माण करण्यात येत आहेत. त्यापैकी बहुतांशी काम झाले आहे. काही ठिकाणी हे काम रखडले असून, पावसानंतर होणार आहे; परंतु आज शहरातील अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था आहे. या रस्त्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवर एक डांबरीकरणाचा थर टाकून रस्ते गुळगुळीत केले जातात. पावसाळ्यानंतर हेच रस्ते खड्ड्यात जातात कारण, रस्त्यामध्ये एक खड्डा पडला की, हळूहळू तो एवढा मोठा होतो की, डांबरीकरणाचा पूर्ण थर निघून बाजूला ढिगारा तयार होतो. या रेव्यावरूनही वाहने घसरून अपघात झाले आहेत. शहरातील रस्त्याचे हे विदारक चित्र ‘सकाळ’ने ठळकपणे मांडले. त्याची दखल पालिकेने घेतली आहे. पावसाची उघडीप पाहून पालिकेने रस्त्यात पडलेले खड्डे बुजवून तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे.