प्रलंबित प्रश्न तडीस नेण्यासाठी बँक व्यवस्थापनाविरुद्ध फेडरेशन ऑफ बँक ऑफ इंडिया कर्मचारी युनियनने आंदोलन सुरू केले असून, ते २७ पर्यंत चालू राहणार आहे. त्यानंतरही बँक व्यवस्थापनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबरला पुन्हा संप करू, असा इशारा संघटनेतर्फे दिला आहे. ग्राहकांना चांगल्याप्रकारे सेवा देता यावी यासाठी क्लार्क, शिपाई व आर्मगार्ड यांची पुरेशा प्रमाणात भरती करणे, अनेक शाखांमध्ये एकच क्लार्क कम कॅशिअर आहे. बहुतांशी शाखांमध्ये शिपाईच नाहीत.
शाखा सुरक्षित राहण्यासाठी आर्मगार्ड यांची भरतीच गेली कित्येक वर्षे केलेली नाही. विनंती बदली मागितलेल्यांच्या ऑर्डर तत्काळ काढणे, बँकेने औद्योगिक विवाद कायद्याचे उल्लंघन करू नये अशा विविध मागण्या व्यवस्थापनापुढे ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर बँक व संघटना यामध्ये अंतर्गत करार झाले आहेत, त्याचे उल्लंघन करू नये. कायमस्वरूपी नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग करू नये, व्यवस्थापनाचे कामगारविरोधी किंवा पक्षपातीपणा केला जात आहे असे संघटनेचे मत आहे.
या आंदोलनाच्या कार्यक्रमानुसार, रत्नागिरीत शिवाजीनगर येथील बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयासमोर संघटनेने मागण्यांचे फलक दाखवून शांतपणे निदर्शन केली. ही निदर्शने यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी शहरातील महिला सभासदांसह रत्नागिरी तालुक्यातील सर्व शाखांमधील सदस्य उपस्थित होते. या आंदोलनाचे नेतृत्व सचिव विनोद कदम, उपाध्यक्ष मनोज लिंगायत, मयूर चाफले, प्रथमेश किनरे, विक्रांत राणे यांनी केले. या वेळी रत्नागिरीतील शाखांमधून ५० जण उपस्थित होते.