कोकणातील निसर्ग रमणीय समुद्र किनारे हे सातत्याने पर्यटकांना भूरळ घालणारे असेच आहेत. त्याच बरोबर कोकण किनारपट्टीतील ऐतिहासीक मंदिरे, सागरी किल्ले आणि सर्वात महत्वाचे विविध प्रकारचे मासे हे पर्यटकांना कोकणात अगदी खेचून आणतात. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या किनारीभागात अगदी समुद्रालगत गेल्या १० ते १२ वर्षात निर्माण झालेली पर्यटकांसाठीची घरगुती निवारा व्यवस्था, कॉटेजेस, हॉटेल्स यामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत गेल्या १० वर्षांत विक्रमी वाढ झाली आहे. यंदा देखील कोकणातील सागरकिनारे पर्यटकांनी भरू लागले असून आगाऊ बुकींग फुल्ल होत असल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी सांगीतले.. दरम्यान कोकणात आलेल्या या एकूण पर्यटकांपैकी सर्वाधीक पर्यटक डिसेंबर महिन्यात नाताळ आणि नववर्षः स्वागताच्या निमीत्ताने आले होते.
गेल्या १० वर्षांत कोकणातयेणाऱ्या पर्यटकांमध्ये फॅमिली टूरिझम अर्थात सहकुटूंब पर्यटन आणि गृप टूरिझम अर्थात समुह पर्यटन या दोन संकल्पना अधिक दृढ होताना दिसून येत. अटल सेतू आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे कोकणातील जिल्ह्यांशी कनेक्टिव्हिटी सुधारली आहे. ज्यामुळे पर्यटनाला अधिक चालना मिळाली आहे. मुंबई येथील पर्यटक थेट कोकणात पोहोचत आहेत. मुंबईतून रो रो सेवेने आपल्या वाहनांसह थेट रायगड जिल्ह्यात पोहोचता येत असून पूढे जंगल जेट्टींच्या माध्यमातून थेट रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांना पोहोचता येते. हा प्रवास संपुर्णपणे समुद्र किनाऱ्यांनी असल्याने अत्यंत आल्हाददायक असाच असून तो पर्यटकांना भावतो. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे, येथील पर्यटनाला पर्यटकांची विशेष पसंती आहे. ‘कोल्हापूर, सांगली आदि पश्चिम म हाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या येथे मोठी आहे. गेल्या १५ ते २० वर्षांतकोकणातील पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
फक्त नाताळ (ख्रिसमस) आणि नववर्ष स्वागताकरिता येणाऱ्यापर्यटकांच्या माध्यमातून, कोकणातील पर्यटन व्यवसायात ४० ते ४५ कोटी रुपयांची उलाढाल गतवर्षी झाल्याचा अंदाज कोकणातील पर्यटन संस्थांचा आहे. यंदा यामध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज होत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील बहुतांश पर्यटन स्थळे वर्षअखेरीस पर्यटकांनी अगदी भरुन जातात. कोकणातील पर्यटकांचे आकर्षण केवळ समुद्रकिनाऱ्यांपुरते मर्यादित नसून, विविध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांमुळे त्यात वाढ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील स्वयंभू गणेश मंदिर आणि सुंदर समुद्रकिनारा भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करतो. आरे-वारे येथील दुहेरी किनारा तर दापोली येथील हिल स्टेशन आणि नारळी फोफळीच्या बागा पर्यटकांचे आकर्षण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथील स्वच्छ पाणी आणि स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंगची सुविधायुवा पर्यटकांना भुरळ पाडते. सिंधुदुर्ग ऐतिहासिक जलदुर्ग हे मोठे आकर्षण आहे. आंबोली हे पर्यंटकांच्या पहिल्या पसंतीचे ठिकाण आहे.

