कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वच व्यवसाय उद्योगधंदे बंद झाले असून, दारूचा धंदा मात्र तेंव्हा सुद्धा लपून छापून का असेना पण तेजीत सुरु होता. संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात लॉकडाऊनच्या काळात थंडावलेला अवैध दारू विक्री व्यवसाय आता नव्या जोमाने सुरू झाला असून आरवली येथील अवैध दारू विक्री व्यवसायिक आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. या दारु विक्रीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
याबाबतचा आक्षेप आरवली येथील तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष भरत भुवड यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात आपण रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांना निवेदन देऊन अवैध दारू धंदे बंद करावेत अशी मागणी भरत भुवड यांनी केली आहे.
लॉकडाऊन काळात लपून-छपून दारू विक्री सुरू होती. लॉकडाऊनमध्ये शिथीलता येताच शासनाने सरकारमान्य देशी व विदेशी दारू दुकानांना काही अटी शर्ती घालून दारू विक्रीला रीतसर परवानगी दिलेली. सध्या सरकारमान्य देशी दारू दुकानांतून विक्री सुरू आहे. तालुक्यातील आरवली येथेही गावठी दारू विक्री सुरू झाली आहे.
भर चौकातून दारू वाहतूक होत असलेली त्यांची वाहने पोलीसांकडून अडवणे अपेक्षित आहे. पोलीस विभागाचे कर्मचारी वेळोवेळी अवैध दारु विक्रेत्यांकडून धाडी टाकून मुद्देमाल जप्त करतात परंतु जप्त केलेला मुद्देमालाचा हा नेमका कुठून पुरवठा केला गेला? याची चौकशीही करणे गरजेचे आहे. त्यामुळे कितीही कारवाया केल्या तरी या दारू तस्करांचे कुणीही काहीही बिघडवू शकत नाही अशाच अविभार्वात दारु विक्रत्यांची वागणूक दिसते आहे.
एखाद्या वेळी कारवाई झाली तरी पुन्हा नवीन जोमाने दारूची तस्करी करणे सुरू होते. यामुळे जप्त केलेल्या मालाची सखोलपणे चौकशी करण्याची मागणी होत आहे. दारूमुळे अनेक संसार आज उघड्यावर येत आहेत. अवैध दारु विक्रीचा प्रकार आरावलीत सर्रास सुरू असून वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाला सूचना देऊनही या प्रकाराकडे लक्ष का दिले जात नाही? असा सवाल भारत भुवड यांनी केला आहे.