मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर त्यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग, रायगड जिल्ह्यातील संभाव्य पूरस्थितीत मदत आणि बचाव कार्यासाठी कोल्हापूर विमानतळावरील विस्तारीत धावपट्टीचा वापर आणि नाईट लँडींगची सुविधा सुरू करा, असा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी दिली. त्याबाबतही निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.
संभाव्य पूरस्थितीसाठी १५ जूनपासून एनडीआरएफचे पथक तैनात करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिले आहेत. मागील वर्षी कोकणातील काही गावांमध्ये निर्माण झालेली महापुराची परिस्थिती खूपच भयावह होती. आणि अचानक उद्भवलेल्या संकटाने त्यामध्ये कोरोनाचे घोंघावणारे संकट त्यामुळे पूरग्रस्तांना मदतीचा हात वेळेत पोहोचवणे कठीण बनले होते. शासनाकडून मिळणारी मदत देखील उशिराने पोहोचल्याने पुरग्रस्तांची इकडे आड तिकडे विहीर अशी फसल्यागत अवस्था झाली होती. पावसाळ्यामध्ये पावसाची स्थिती कशा प्रकारे असेल ते आताच सांगू शकता येणार नसल्याने, आधीच सतर्क असणे गरजेचे आहे.
गेल्या दोन वर्षात पावसाची सुरूवात ही वादळांनीच झाली आहे. यंदा देखील पाऊस चांगला पडेल असा अंदाज आहे. सर्व यंत्रणांनी आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी पूर्वतयारी केली आहे. पावसाळ्यापूर्वी प्रथमच एनडीआरएफच्या नऊ तुकड्या सात जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत शून्य जीवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. जलसंपदा विभागाने धरणसाठ्यातील पाणी सोडण्याबाबत योग्य नियोजन करून संबधित अधिकाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याबाबत आदेशित करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्सूनपूर्व बैठकीत केल्या.