रत्नागिरीमध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यान गर्दीचा फायदा उठवत भाजप कार्यकर्यांच्या चेन, ब्रेसलेट, रोख रक्कम चोरट्यानी लांबवलेल्या. या सोनसाखळी चोर टोळीचा पर्दाफाश रत्नागिरी पोलिसांनी केला असून चोरट्यांचे कारनामे जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, या टोळीमध्ये दत्ता जाधव , पशुराम गायकवाड, दत्ता गुंजाळ, सागर कारके, नितीन गायकवाड, रमेश जाधव, बाळू जाधव टोळीतील संशयितांची नावे आहेत. सर्व राहणारे बीड येथील आहेत. बीडची एक चोरांची टोळी भाजपच्या जनाशीर्वाद यात्रेमध्ये कधी पक्ष कार्यकर्ते तर कधी सामान्य माणूस बनून वावरत होते.
रत्नागिरीमध्ये बीडची ही टोळी गर्दीचा फायदा घेऊन ब्रेसलेट, सोनसाखळी खेचल्या होत्या. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवून वेगाने तपासकाम केल्याने अवघ्या काही कालावधीमध्येच या चेन चोरीतील टोळीमधील एकाला कणकवली येथे पकडण्यात यश आले. त्यांनतर पोलिसांनी अन्य सहा जणांना बीड येथून ताब्यात घेऊन संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला.
त्यांनी कसे कृत्य केले हे सांगताना पुढे म्हणाले, जनआशिर्वाद यात्रेमध्ये गर्दीचा फायदा घेत चार जणांच्या खांद्यावर हात ठेवून गळ्यातील ४ चेन कट करुन तसेच पाकिटमारी करुन रोख रकमेसह २ लाख ४१ हजार ८०० रुपयांच्या मुद्देमालाची चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी वेगाने तपास करत गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे बीड येथून संशयितांना उचलले. त्यांची चौकशी केली असता संशयित हे सराईत गुन्हेगार असून ते ठिकठिकाणी होणाऱ्या धार्मिक जत्रा , मेळावे तसेच रॅलींमध्ये सहभागी होउन अशाप्रकारे चोरी करण्यात माहीर असल्याची माहिती मोहितकुमार गर्ग यांनी दिली.