रत्नागिरीच्या भवितव्याचे भाग्यविधाते होऊ या कार्यक्रमामध्ये भाजपचे ॲड. दिपक पटवर्धन यांनी जिल्हा बैठकीत बोलतांना नाराजगी व्यक्त केली. तळकोकणात म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु होत आहे, शासकीय मेडिकल कॉलेज सुरु होत आहे, अशा अनेक सुविधा इतर जिल्ह्यांना प्राप्त होत असताना रत्नागिरी फक्त उपेक्षित का? जिल्ह्यात विमानतळ राहू दे, निदान रस्ते तरी गुळगुळीत होऊदे. अख्खी रत्नागिरी खड्ड्याने व्यापली असून, फक्त कोट्यावधीच्या मंजूऱ्या कागदोपत्री झाल्याचे घोषित होत आहे.
रत्नागिरीकरांच्या नशिबी फक्त खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढणे एवढेच आहे असे वाटते. खड्डे भरण्यासाठी आता ऑक्टोबर मधली तारीख मिळाली असून, तोपर्यंत मात्र रत्नागिरीतील नागरिकांनी खड्ड्यात रस्ते कुठे सापडतात का शोधावेत. सिंधुदुर्गातील सुदैवी जिल्हावासी विमानातून उड्डाण करण्याच्या तयारीत असून, रत्नागिरीमध्ये मात्र साधा एस.टी. स्टँडची दुरुस्ती होताना वानवा आहे. अनेक वर्षे काम रखडत राहिलेले, बंद पडलेले एस.टी. स्टॅन्डचे काम रत्नागिरीच्या सौंदर्यात चार चांद लावत आहेत. हा नाकर्तेपणा, नियोजनशून्य कामकाज हा स्थायीभाव झाला आहे असे ॲड.दीपक पटवर्धन म्हणाले.
रत्नागिरीकर सुज्ञ, संयमी आणि सुसंस्कृत असल्याने वैद्यकीय कॉलेज परिपूर्ण मुंबई विद्यापीठ उपकेंद्र, औद्योगिक प्रकल्प यांची रत्नागिरीमध्ये गरज नाही असा ठाम विश्वास निर्माण झाला आहे. हा विश्वास निर्माण करण्यात येथील राजकीय व्यवस्था चांगल्या प्रकारे यशस्वी झाली आहे. रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय होऊ शकतात, फक्त रत्नागिरी जिल्ह्याला वैद्यकीय विद्यालयाची गरज नाही. कारण इथल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य फक्त रत्नागिरी एस.टी. स्टँड सारखे विष्पन्न झाले आहे.
रत्नागिरीत वैद्यकीय कॉलेजची घोषणा होते. मात्र लालफितीत निर्णय गायब होतो. रत्नागिरीमध्ये काहीही नवीन उद्योगधंदे सुरु होता कामा नये. एक हि नवा औद्योगिक प्रकल्प स्थापू द्यायचा नाही. युवकांचे भवितव्य अंधकारमय करायच हा चंगच बांधला गेला आहे. रत्नागिरीचे जिल्हा शासकीय रुग्णालय परिसर आहे मोठा, पण तिथे पूर्णवेळ फिजिशियन देखील नाही. जिल्हा रुग्णालयांत पुरेसे तज्ञ वैद्यकीय अधिकारी नाहीत. कि पुरेसा स्टाफ नाही.
त्यामुळे नकारात्मक परिस्थितीमधुन रत्नागिरी जिल्ह्याला बाहेर काढण्यासाठी मुख्य व्यवस्थेमध्येच बदल घडवून आणणे आवश्यक आहे. विकासाची दिशा, नवनवे प्रकल्प, शैक्षणिक सुविधा, प्रशस्त रस्ते, पायाभूत सुविधा, सांस्कृतिक केंद्र हे रत्नागिरीकरांनी फक्त आभासी दुनियेमाध्येच पहायचे!.