शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबत युती करताच भाजपने टीका करत सेनेची खिल्ली उडवली. भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “ही युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे”, अस म्हटलं होतं. या टीकेला आता शिवसेनेतून आमदार भास्कर जाधव यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिलं आहे.
शिवसेनेनं पक्षातील फुटीनंतर अडचणीत सापडेलल्या आता उभारी घेण्यासाठी नवे मार्ग आजमावून पाहण्याचा निर्णय घेतला आहे. याच अनुषंगाने आम्ही संभाजी ब्रिगेडसोबत युती करत असल्याची घोषणा नुकतीच शिवसेना नेतृत्वाकडून करण्यात आली. ‘भाजपने आजवर रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोत, दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम, रासपचे महादेव जानकर यांच्यासोबत युती केली. मात्र आज या सगळ्यांची काय अवस्था झाली हे आपण बघताय. शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे की जो मैत्री करतो व त्याला कायम जागतो. संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्याबद्दल मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धन्यवाद देतो,’ असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
त्यासोबतच भास्कर जाधव यांनी दसरा मेळाव्याबाबत बोलताना, दसरा मेळावा हा इतिहास आणि शिवसेनेची परंपरा आहे. ती कोणीही रोखण्याचा प्रयत्न करू नका, असा सूचक इशारा दिला आहे. दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात होणाऱ्या शिवसेनेच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतं. मात्र यंदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून बाजूला झालेल्या शिंदे गटाने हा मेळावा करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याची चर्चा रंगत आहे. यावर उत्तर देताना भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे की, ‘शिवसेनेच्या नादाला लागाल तर भस्मसात व्हाल. शिवसेना हा जुना पक्ष असुन तो हिंदुत्वाचा अंगार आहे, निखारा आहे. शिवसेनेच्या नादाला लागू नका, अन्यथा राजकीय कारकीर्द भस्मसात होईल.