रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे तत्काळ तिकीटविक्री ठिकाणी काळ्या बाजारास रेल्वे कर्मचाऱ्यांचे साह्य मिळते. त्यामुळे हा काळा बाजार जर थांबला नाही तर रेल्वेस्थानकबाहेर येऊन सनदशीर मागनि आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजपा शिष्टमंडळाने विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदनाद्वारे दिला. या संबंधी भाजपचे पदाधिकारी सतेज नलावडे, दीपक आपटे, नितीश अपकरे, योगेश गराटे यांनी निवेदन दिले. शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे तत्काळ तिकीटविक्री कक्षात दगडाखाली मागील १-२ महिन्यापासूनचे फॉर्म भरून ठेवलेले आढळतात. तिकीट काळा बाजार करणारे १-२ मिनिटांपूर्वी आयत्यावेळी येऊन आपले ते फॉर्म भरलेले आहेत, असे सांगून पहिल्या नंबरवर तिकीट घेतात व तेथे २-३ तासापासून उभ्या असलेल्या नागरिकांना मागे करतात.
सामान्यतः पुढील १-२ नंबरना तत्काळ तिकीट उपलब्ध होऊ शकतात. बाजारातील तिकिटे काळ्या मग चढ्या भावाने विकली जातात. तत्काळ एसी तिकीटदरापेक्षा ४०० रुपयांपेक्षा जास्त दर व असे एजंट रत्नागिरीमध्ये आहेत. अशा घटनेवेळी उपस्थित नागरिकांनी आवाज उठवला तर रेल्वे तिकीट कर्मचारी रेल्वे पोलिस बोलवून संबंधित नागरिकास दमात घेतात. वास्तविक, कर्मचाऱ्यांनी हा काळाबाजार थांबवणे जरूरी आहे; परंतु हे कर्मचारी काळ्या बाजारला सहाय्य करतात, असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला असून, विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. याबाबत रेल्वेमंत्र्यांनाही कळवणार असल्याचे भाजपच्यावतीने सांगण्यात आले.

