23 C
Ratnagiri
Monday, January 26, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeKhedवाशिष्ठीवरील ब्रिटिशकालीन पूल इतिहासजमा

वाशिष्ठीवरील ब्रिटिशकालीन पूल इतिहासजमा

बहादूरशेख नाका येथील हा पूल शंभर वर्षांपूर्वी बांधलेला होता.

चिपळूण शहर व खेड येथील महापुरास कारणीभूत ठरणारा, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेख येथील वाशिष्ठी नदीवरील ब्रिटिशकालीन पूल अखेर इतिहासजमा झाला आहे. गेले चार महिने सुरू असलेले या भागातील दोन्ही जुने पूल तोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे वाशिष्ठी नदीचे पाणी वेगाने प्रवाहित होणार आहे. हा पूल पाडण्यासंदर्भात माजी नगरसेवक अरुण भोजने यांच्यासह काहींनी पाठपुरावा केला होता. बहादूरशेख नाका येथील हा पूल शंभर वर्षांपूर्वी बांधलेला होता. हा पूल मातीच्या बंधाऱ्यावर ८० टक्के बांधलेला होता. त्यामुळे १२५ मिमीच्या पुढे पाऊस पडला की, या पुलास पाणी अडतं आणि ते संपूर्ण खेड-कळंबस्ते आणि चिपळूण शहरात पसरतं आणि पूर येत असे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात वाशिष्ठी नदीवर नवा पूल बांधण्यात आल्यानंतर जुना पूल महापुरास कारणीभूत ठरत असल्याने तो तोडण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून सुरू झाली होती.

यामध्ये माजी नगरसेवक भोजने यांनी या संदर्भात पाठपुरावा केला होता; मात्र, काही राजकीय नेत्यांच्या भूमिकेमुळे हा पूल पाडण्यास विरोध दर्शवला. त्यामुळे वाशिष्ठी नदीवरून पूल पाडण्याबाबत अनिश्चितता होती. तरीही माजी नगरसेवक भोजने यांनी पाठपुरावा सातत्याने सुरूच ठेवला होता. प्रसंगी १५ ऑगस्ट २०२४ उपोषणाचा इशारादेखील दिला होता. याच अनुषंगाने एमआयटी मुंबईच्या तज्ज्ञ अभियंत्यांनी या पुलाची पाहणी केली. त्यानंतर पूल पाडणे गरजेचे आहे, असा अहवाल समितीने संबंधित विभागाला आणि महसूल विभागाला दिला. त्यामुळे वाशिष्ठी नदीवरील जुना पूल पाडण्यासंदर्भातील तांत्रिक अडचण दूर झाली होती.

राष्ट्रीय महामार्ग विभाग, जलसंपदा विभाग आणि महसूल विभागाकडून पूल पाडण्यासंदर्भातील कार्यवाही देखील सुरू झाली. पावसाळ्यानंतर पूल पाडण्याचे काम सुरू होईल, असे पत्र महसूल विभागाने माजी नगरसेवक अरूण भोजने यांना देऊन उपोषण करू नये, असे सांगितले होते. त्यानुसार गेल्या चार महिन्यांपासून बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदीवरील जुना पूल पाडण्याची सुरवात झाली आहे. हा पूल पाडण्यासाठी १ कोटी २३ लाख ६९ हजार ४३५ रुपयांचा निधी मंजूर झाला. यानंतर फेब्रुवारी महिन्यात हा पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली. चार महिन्यांनंतर आता हे काम पूर्णत्वास गेले असून, या भागातील दोन्ही जुने पूल जमीनदोस्त करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular