शहरातील मिरकरवाडा खडप मोहल्ला येथे एका तरूणाचा आरीने भोसकून निघृण खून झाला. शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील तिघापैकी दोन संशयितानी तेथुन पळ काढला. परंतु अन्य एका सहकाऱ्यांने पोलिसांना फोन करुन खबर दिली. पोलिसांनी संशयितांचे मोबाईल लोकेशन ट्रेस करून रत्नागिरी रेल्वे स्थानकात मोठ्या शिताफीने त्यांना पकडले. प्रिन्स मंगरु निशाद (वय २५, रा. गोरखपुर, उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. संशयितामध्ये मृत तरूणाच्या मामाचा समावेश आहे. कामाच्यावेळी आपला भाचा कायम त्याच्या मैत्रिणीबरोबर फोनवर बोलत असे. याचा मामाला राग यायचा याच कारणावरून शनिवारी मामा-भाच्यामध्ये वाद होऊन, हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी ठेकेदारासह तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मिरकरवाड खडप मोहल्ला येथे सुहेब वस्ता यांनी मोबाईल शॉपी टाकण्यासाठी दुकान गाळा भाड्याने घेतला होता.
त्यामध्ये फर्निचरचे काम करण्याचा ठेका रविकुमार भारती या ठेकेदाराने घेतला होता. त्यासाठी निरज निशाद, अनुज चौरसिया, प्रिन्स मंगरु निशाद हे कामगार त्याने ठेवले होते. ते सर्व गोरखपुर उत्तर प्रदेशचे आहेत. शॉपिचे फर्निचरचे काम अंतिम टप्प्यात होते. निराज निशाद आणि प्रिन्स निशाद हे चुलत मामा भाचे आहेत. प्रिन्स हा कामाच्या वेळी वारंवार आणि बराचवेळ आपल्या मैत्रिणीशी फोनवर बोलत बसायचा. यावरून मामा-भाच्यामध्ये खटके उडत होते. शनिवारी दुपारी देखील प्रिन्स नेम का कामाच्यावेळी पुन्हा मैत्रिणीबरोबर बोलताना पाहून मामा प्रचंड संतापला. दोघांमध्ये पुन्हा वाद झाला तो एवढा विकोपाला गेला की, निराज आणि अनुज चौरसिया या दोघांनी प्रिन्स निशाद याला मारहाण केली. यावेळी मामाने फर्निचरचे काम करण्यासाठी वापरात येणारी आरी भाच्याच्या छातीत भोसकली. हा वार एवढा वर्मी होता की प्रिन्स निशाद रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि काही वेळात जागीच ठार झाला.
शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर, स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधीक्षक नितीने बगाटे यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली. खुन झाल्यानंतर काही तासात पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेनंतर निरज निशाद आणि अनुज चौरसिया हे दोघांनी तेथून पळ काढला. परंतु ठेकेदार रविकुमार भारती तिथेच होता. त्याने याबाबत स्थानिकांना विचारून ११२ या टोल फ्री नंबरवरून पोलिसांना खबर दिली. शहर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या दरम्यान पळुन गेलेल्या दोघांचे पोलिसांनी मोबाईल नंबर मिळवुन त्याचे लोकेशन ट्रेस केले. तेव्हा दोघे रेल्वे स्थानकात होते. तेथून ते रेल्वेने पळुन जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेतले.