दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ आदी भागांत भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलची सेवापुरती कोलमडली आहे. गेले दहा दिवस या भागांमध्ये नेटवर्क नसल्याने ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे. चांगली सेवा देण्यास कंपनी अपयशी ठरत असल्याने ग्राहकांमध्ये कंपनीच्या कारभाराबाबत प्रचंड संताप आहे. कंपनीने उभारलेले मोबाईल टॉवर फक्त शोभेसाठीच आहेत का, अशी प्रतिक्रिया ग्राहकांकडून उमटत आहे. काही ग्राहकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. गावतळे हे सर्व सोयी-सुविधांयुक्त गाव आहे. तेथे गेले १० दिवस बीएसएनएलचे नेटवर्क नाही. तेथे पर्याय नेटवर्क आहे; मात्र दाभिळ, पावनळ, उन्हवरे ही गावे दुर्गम भागात आहेत. अशा ठिकाणी फक्त बीएसएनएलच्या मोबाईल सेवेचा ग्राहकांना लाभ घेता येतो; मात्र या गावात गेले अनेक दिवस नेटवर्क नाही. त्यामुळे येथील लोकांना एखाद्या प्रसंगी संपर्क करणे कठीण होत आहे.
मोबाईल रिचार्ज फुकट जात आहेत; मात्र तरीही कंपनी हे मोबाईल टॉवर सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष करत आहे. येथील नागरिक वारंवार तक्रारी करूनही कंपनी अधिकारी लक्ष देत नाहीत. त्यामुळे ग्राहक चांगलेच संतापले आहेत. दुर्गम भाग असल्याने वाहनाच्या सोयी-सुविधादेखील कमी आहेत. अशावेळी एखाद्या नागरिकास वैद्यकीय मदत लागली तर नेटवर्क नसल्याने तीही वेळेत मिळत नाही. पावसाळा आहे त्यामुळे साप, विंचू, नैसर्गिक आपत्ती अशा घटना घडत असतात. अशा वेळी प्रशासनाला संपर्क साधण्यासाठी मोबाईल सेवा कामी येते; परंतु नेटवर्क नसल्याने ही सेवा कुचकामी ठरत आहे.