राज्यात कोरोनाचे संक्रमण आता कुठे आटोक्यात यायला लागले आहे तर नवीन व्हेरीएंटची चर्चा ऐकिवात येत आहे. दक्षिण आफ्रिकेसह बोटस्वाना, हाँगकाँग या भागात आढळून आलेल्या कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातल्या सर्वच देशांची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचं आता जागतिक आरोग्य संघटनेने नावही निश्चित केलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या या कोरोना व्हेरिएंटला ओमीक्रोन हे नाव दिल्याचं जाहीर केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रणेने सांगितलं की कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत आत्तापर्यंत B.1.1.529 या नावाने ओळखला जाणारा हा व्हेरिएंट वेगाने प्रसार होणारा असून यामुळे होणारा संसर्गही गंभीर स्वरुपाचा असणार आहे. तसंच ज्यांना आधी कोरोनाची लागण झालेली आहे, त्यांना या विषाणूची त्वरित लागण होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे.
भारतात सर्वप्रथम आढळलेल्या आणि नंतर जगभरात पसरलेल्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही हा नवा व्हेरिएंट अतिशय घातक असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. तज्ज्ञांनाही ओमीक्रोनच्या उगमाबद्दल अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. मात्र हा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेसह बेल्जियम, बोटस्वाना, हाँगकाँग आणि इस्राइल या देशांमध्ये आढळून आल्याची पक्की माहिती मिळाली आहे.
भारत सरकारने सर्व राज्यांना दक्षिण आफ्रिका आणि इतर हाय रिस्क देशांतील आंतरराष्ट्रीय प्रवाशांची जलद चाचणी आणि तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. वेगाने पसरणाऱ्या नवीन व्हेरीयंटमुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओमीक्रोन व्हेरीयंट बाधीत देशांमधील सर्व उड्डाणे बंद करण्याचे आवाहन केले आहे. २ वर्षाच्या भयावह कालखंडानंतर, मोठ्या कष्टाने आपला देश कोरोनापासून सावरला आहे. हा नवीन प्रकार भारतात येण्यापासून रोखण्यासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत, ते म्हणाले.
विमान वाहतूक मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की १५ डिसेंबर २०२१ पासून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सामान्य वेळापत्रकानुसार सुरू होणार आहेत. पण, काही देशांमध्ये नव्याने कोविड व्हेरीयंटच्या उद्रेकामुळे या १४ देशांना वगळण्यात आले आहे. त्या देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, ब्राझील, चीन, मॉरिशस, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, सिंगापूर, बांगलादेश, नेदरलँड, फिनलंड, न्यूझीलंड, बोटस्वाना आणि झिम्बाब्वे या देशांचा समावेश आहे.