कोकण रेल्वेने गणपतीसाठी कोलाड ते वेर्णा या स्थानकादरम्यान कार रो-रो सेवा जाहीर केली आहे. या सेवेसाठी मुंबईतून वाहनाने कोलाडला जावे लागेल आणि तेथून गाडी थेट गोव्यात उतरवावी लागेल. ही सेवा अन्य कोणत्याही स्थानकावर मिळणार नाही. त्यामुळे त्यामुळे या सेवेऐवजी अतिरिक्त एक्स्प्रेस चालवावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. कोकण रेल्वेच्या कार रो-रो सेवेत चारचाकी वाहने लोड करण्यासाठी मुंबईमधून १०० किलोमीटर अंतर पार करून तीन तास आधी कोलाड रेल्वेस्थानकावर पोहोचावे लागणार आहे. चारचाकी उतरवण्यासाठी वेर्णा येथे जावे लागेल. तिथून कोकणात येण्यासाठी चाकरमान्यांना साधारण १० तास वेळ वाया घालवावा लागेल. या सेवेमुळे चाकरमान्यांना वेळेत कसे पोहोचता येणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कार रो-रो गोव्यात पोहोचण्यासाठी १२ तास लागतील. कुटुंबातील पाच सदस्यांचा कोकणात येण्याच कार प्रवास पाच ते सहा हजार रुपयांत होतो. मात्र, रो-रो कार सेवेचे भाडे ७ हजार ८७५ (जीएसटीसह) आकारले जाणार आहेत. कारसोबत जाणाऱ्यांनाही अतिरिक्त तिकीट काढून जावे लागणार आहे. त्यामुळे नाकापेक्षा मोती जड अशी स्थिती होणार आहे. तसेच कार रो-रो सेवेसाठी लागणारे रेल्वेचे मनुष्यबळ, सेवेसाठी लागणारा वेळ, मार्ग उपलब्ध न होणे या कारणामुळे, तसेच जादा भाड्यामुळे या सेवेला प्रतिसाद मिळणे कठीण आहे. त्यामुळे सेवा रद्द करून, अधिकाधिक प्रवासी विशेष रेल्वेगाड्या चालवाव्यात, त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल.
वेळापत्रकावर विपरीत परिणाम – एका वाहनामागे फक्त ३ प्रवाशांची अट अव्यवहार्य आहे. गणपतीसारख्या सणामध्ये कुटुंबात ५ ते ७सदस्य एकत्र प्रवास करतात. फक्त ३ प्रवाशांना परवानगी असल्याने उर्वरित सदस्यांसाठी स्वतंत्र प्रवासाची व्यवस्था करावी लागेल. रो-रो सेवा चालवण्यासाठी लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट, ट्रेन व्यवस्थापक यांचा स्वतंत्र ताफा लागतो.