केंद्र सरकारने लागू केलेला हिट अँड रन या काळ्या कायद्याविरोधात देशभर सर्वत्र चालकांचे आंदोलन सुरू आहे. यामध्ये खेड तालुक्यातील चालकही मोठ्या संख्येने सहभागी झाले असून त्यांनीही चक्का जाम आंदोलनात स्टेरिंग छोडो करत आपापल्या गाड्यांना ब्रेक लावला आहे. बुधवारी (ता. ३) आंदोलनाबाबत अंतिम निर्णय होणार असून हा निर्णय शासनाने मागे न घेतल्यास ४ तारखेनंतर मात्र हे आंदोलन तीव्र होणार असे मत वाहनचालकांनी व्यक्त केले. हिट अँड रन कायद्याला विरोध करण्यासाठी खेड तालुक्यातील चालकांनी एकत्रित येत २ जानेवारीला सकाळी तहसील कार्यालय येथून भरणे नाकापर्यंत निषेध रॅली काढली.
भरणे नाका येथील विविध वाहन चालकांशी बोलून त्यांना या कायद्याविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी हा कायदा लायसन्स असणाऱ्या प्रत्येकाला लागू होणार असून तो ट्रक चालक असो की दुचाकी चालक सर्वानाच लागू होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या कायद्यानुसार होणाऱ्या शिक्षेची तरतूद ही सर्वांसाठी सारखी असल्याचे सांगत हा कायदा रद्द होण्याची मागणी केली. कोणताही ड्रायव्हर हा जाणीवपूर्वक अपघात करत नाही. अपघातावेळी मोठ्या वाहनांचे चालक अपघातस्थळावरून पळून गेले नाही तर जनतेचा रोष ओढवून घेवून मार खावा लागतो.
त्यामुळे सरकारने अपघातानंतर चालकांना होणाऱ्या मारहाणीबाबत कठोर कायदा बनवावा म्हणजे कोणताही ड्रायव्हर अपघातस्थळावरून पलायन करणार नाही असे मतही व्यक्त केले. “हिट अँड रन” कायद्याविरोधात सर्वत्र चालकांचे आंदोलन सुरू असल्याचा फटका येथील पेट्रोल पंपाना बसला. भरणे नाका परिसरातील सर्वच पेट्रोल पंपावर पेट्रोल संपल्याचा बोर्ड लावण्यात आल्याने भरणेमध्ये काही ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी एकच गर्दी झाल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले.
“हिट अँड रन” कायद्याविरोधात सर्वच चालक आक्रमक झाले असून हा कायदा रद्द होण्याच्या मागणीला सर्व चालकांनी पाठिंबा दिला आहे. त्यामूळे इंधन वाहतूक करणारे ट्रक न आल्याने पेट्रोल टंचाई सांगून दुचाकी स्वारांना परत धाडले जात होते. तर भरणे येथे महामार्गालगत असलेल्या काही पंपावर पेट्रोल शिल्लक होते. अशा ठिकाणी दुचाकीसह चार चाकी वाहन चालकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली होती. पंपावर अचानक गर्दी झाल्याने पेट्रोल घेण्यासाठी झुंबड उडाली होती. दरम्यान या आंदोलना चा फटका सर्व सामांन्याना बसत असून दोन दिवसांत पेट्रोल उपलब्ध न झाल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.