रत्नागिरीतील चांदोर येथील सापुचे तळे या तळ्याच्या संवर्धन व सुशोभीकरण करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी दीड कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या तळ्याचे सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या कातळावरील भागांमध्ये पूर्वीच्या काळी पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. त्यामुळे या भागातून जाणाऱ्या वाटसरू व जनावरे यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी सापू नावाच्या माणसाने त्याकाळी कातळामध्ये खोदकाम करून तळ्याची निर्मिती केली. हे तळे पांडवकालीन असल्याचे जाणकार सांगतात.
सध्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वस्ती झाली आहे. या तळ्याचा उपयोग या परिसरातील लोकांना व्हावा व पर्यटनाच्या दृष्टीने त्याला महत्त्व यावे यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत या तलावाच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी दीड कोटीचा निधी जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये मंजूर केला. या तलावातील गाळ काढून परिसर स्वच्छता व दुरुस्ती आदी कामे करून या भागातील नागरिकांना कातळावर क्षणभर विश्रांतीसाठी या तळ्याचा भविष्यात चांगला उपयोग होणार आहे. सदर तळे रस्त्याच्या व तालुक्याच्या विभाजनामुळे लांजा तालुक्यात वाडीलिंबू हद्दीमध्ये समावेश आहे.