सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरु होणार याच्या चर्चेपेक्षा त्याच्या उद्घाटन प्रसंगी कोणाला निमंत्रित केले जाणार, निमंत्रण पत्रिकेचा फॉरमट कसा असेल याबाबत चर्चा सुरु आहे.
जसजशी उद्घाटनाची तारीख जवळ येत आहे, तसे विमानतळावरून सुरू झालेले आरोप प्रत्यारोप, मानपानावरून नाराजगी अजूनच वाढलेली दिसत आहे. आधीच विमानतळाच्या श्रेयवादावरून अनेक वाद सुरु असून, आत्ता उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे नाराज असल्याची चर्चा कानावर आली आहे.
विमानतळ उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव ३ नंबरवर आहे. यामध्ये पत्रिकेच्या छापनामध्येही राजकारण झाल्याच्या राणेंचे म्हणणे आहे. मात्र यावरुन गप्प बसेल ती शिवसेना कसली! शिवसेनेने राणेंवर निशाणा साधत म्हंटले आहे कि, “शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे निमंत्रण पत्रिका तयार केली गेली आहे. तीन नंबरच्या स्थानावरून जर हे उहापोह करतील, तर ते त्याचं अज्ञान असेल. त्यांनी चांगला गुरु ठेवावा आणि चांगले मागदर्शन घ्यावं”, असा खोचक टोला खास विनायक राऊत यांनी लगावला आहे.
पुढे राऊत म्हणाले कि, आम्हाला कार्यक्रम कुणाला बघून असा करायचा नाही. शासकीय प्रोट्रोकॉलप्रमाणे ज्यांना बोलवणं आवश्यक आहे. त्या सर्वांना मान सन्मानाने बोलावण्याचे काम महाराष्ट्र सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. जे कोण इतर सांगत होते कि, आम्ही यांना बोलावणार नाही आणि त्यांना बोलावणार नाही, अशा भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केलेले नाही. ज्यांचा जसा मान सन्मान आहे त्यांना त्याचप्रमाणे सन्मान महाराष्ट्र सरकार देणार आहे. विमानतळाचे श्रेय आम्हाला घ्यायचं नाही तर ते आमचे कर्तव्य आहे”, असे विनायक राऊत म्हणाले