नारायण राणे यांची केंद्रीय उद्योग मंत्री म्हणून निवड झाल्याने कोकणवासियांसाठी हि एक आनंदाची बातमीच आहे. नारायण राणे हे सुद्धा कोकणाच्या विकासकामांसाठी सक्रीय झाले असून, काल हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन सिंधुदुर्ग येथील हवाई वाहतूकीबाबत चर्चा केली. चिपी विमानतळाला केंद्रीय मंत्री वाहतूक मंत्री यांनी त्वरित मंजुरी देऊ अशी ग्वाही दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचा श्रीगणेशा कधी होणार ! यावर अनेक मतांतरे झाली आहेत. परंतु, नारायण राणेंनी केंद्रातून एक गोड बातमी कोकणवासियांसाठी आणली आहे. केंद्र सरकार लवकरच चिपी विमानतळातून हवाई वाहतूक करण्यासाठी परवानगी देणार असल्याची ग्वाही केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांना दिली आहे. त्यामुळे विमानतळाला केंद्र सरकारची परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या महिन्याभरात विमानतळाचे उद्घाटन ना. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि ना. नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.
मागील कित्येक वर्षे रेंगाळलेल्या हा चिपी विमानतळाचा शुभारंभ मात्र आता येत्या महिनाभरातच होणार असून याचे भूमिपूजन सुद्धा ना.नारायण राणे यांच्या हस्ते पार पडले होते. त्यामुळे आता उद्घाटनही त्यांच्याच हस्ते केले जाणार आहे. त्याचप्रमाणे नारायण राणे यांनी पुढे सांगितले कि, आपल्या सोबत उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी स्वतः केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मागच्या गणपतीपासून विलंब झालेला मुहूर्त येत्या गणपतीमध्ये येऊन ठेपला असल्याची चिन्हे दिसत आहेत, आणि ही प्रत्येक कोकणवासियासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.