चिपळूण मधील ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०२४ पर्यंत ”हर घर नलसे जल” या योजनेमधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत सन २०२० ते २०२४ पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागांतील कुटुंबांना नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. या नवीन योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. यापूर्वी अस्तित्वातील ४० लिटरप्रमाणे पाणी उपलब्ध असणाऱ्या जुन्या योजनादेखील आता ५५ लिटर प्रतिमाणसी प्रतिदिवस योजनेमध्ये परिवर्तित होणार आहेत. त्यानुसार चिपळूण तालुक्यातील १६२ गावांमध्ये ही योजना राबवली जात आहे.
शासनाने ”हर घर नलसे जल” या उपक्रमांतर्गत २०२४ पर्यंत नळाद्वारे दरडोई ५५ लिटर पाणी देण्याचा संकल्प केला आहे. यासाठी नियोजित जलजीवन मिशनला यशस्वी करताना सर्वप्रथम तहानलेल्या गावांसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा उपाययोजना कार्यान्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दरवर्षी ठराविक कालावधीमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. त्यावर मार्ग काढण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत आखणी सुरू आहे. त्यामुळे एखाद्या ठेकेदाराने योजनेचे काम हाती घेतल्यास विनाविलंब आणि कोणत्याही अडचणी न सांगता योजना पूर्ण करावी लागणार, अशा सूचना त्यांनी ठेकेदारांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील अशा ५३ गावांची यादी तयार करण्यात आली असून त्या गावांचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले आहेत. या गावातील पाणीयोजना राबवण्यापूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित योजनेचे काम करू इच्छिणाऱ्या ठेकेदारांची बैठक घेतली.
त्याचप्रमाणे, सर्व शाळा, अंगणवाड्या यांना देखील पुढील १०० दिवसांत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्याचे उद्दिष्ट या मिशनमध्ये निश्चित करण्यात आले आहे. दहा ते ४० लाख अंदाजपत्रकाच्या योजनांना मंजुरी मिळाली आहे. मोठ्या अंदाजपत्रकांच्या योजना अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.