चिपळूणमध्ये येत असलेल्या पुरावर उपाययोजना करण्यासाठी शिव व वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. गाळ काढताना वाशिष्ठी नदीतील अनेक वर्षापूर्वीचे जुने बेटही करण्याचा घाट घातला जात आहे. पालिकेने शिव नदीतील गाळ काढून स्वच्छ केली. नदीकिनारी असलेली झाडे झुडपेही तोडण्यात आली. त्यामुळे शिव नदीतील मगरींचा अधिवास संपुष्टात आला आहे.
वाशिष्ठी नदी व खाडीमध्ये असणारे नैसर्गिक बेट हे येथील मगरींचा मुख्य अधिवास आहे. तेथे मगरींची घरटी, अंडी आणि पिल्ले असतात. परंतु नदीतील गाळ काढण्याच्या कामांमध्ये येथील बेटे काढली जात आहेत. नदीतील झाडेझुडपेही काढली आहेत. त्यामुळे नदीमधील मगरींचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या महापुरामध्ये अतिवृष्टीमध्ये पाण्याचा निचरा व्हायला जागाच शिल्लक नसल्याने मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना चिपळूण आणि आजूबाजुच्या परिसरातील जनतेला करावा लागला. अनेक ठिकाणी तर मगरींचा वावर देखील दिसून आला.
आतापर्यंत शिव नदीत मगरी विसावा घेण्यासाठी निर्धास्तपणे वावरताना दिसत होत्या. एखाद दुसरी मगर मानवी वस्तीत देखील दिसून येत होती. आता शिव नदीतील झाडेझुडपे काढल्यामुळे मगरींचा विसावा घेण्याचे नैसर्गिक ठिकाण संपुष्टात आले आहे. त्यामुळे या मगरी भर वस्तीत देखील दिसून येत आहेत. शिवनदीचा गाळ बऱ्याच प्रमाणात साफ करण्यात आल्याने, पाण्याची खोली देखील वाढल्याचे दिसून आले आहेत. पूर्वी नौकेद्वारे देखील मालाची वाहतूक केली जात होती, त्याची सुद्धा ट्रायल घेण्यात आली असून, वाहतूक व्यवस्थित होत असल्याने पात्राची खोली वाढली असून, पावसाच्या पाण्याचा साठा होण्यास उपयुक्त ठरणार आहे.