प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २७) दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम हापूसवर होण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे तसेच तुडतुडे, पांढरी माशी व मावा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे दापोली कोकण कृषी विभागाकडून सांगण्यात आले. मागील पंधरा दिवस जिल्ह्यात थंडीचा प्रादुर्भाव होता; मात्र या आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात वातावरणाचे रंग बदलले आहेत. आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. थंडीचा जोर कमी झाला आहे. सायंकाळच्या सुमारास वारेही वाहू लागलेले होते. दापोलीत किमान तापमान १५ अंशांवर आले आहे. दर दिवशी दापोलीतील पारा वर चढत आहे. त्यामुळे दापोलीत थंडीचा जोर कमी झालेला आहे. या बदलाचा सर्वाधिक परिणाम आंबा बागांवर होणार आहे. हवामान विभागाकडून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली असल्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन कीटकनाशक व बुरशीनाशकांच्या फवारण्या कराव्यात, असा सल्ला देण्यात आला.
तुडतुडे, पांढरी माशी व मावा इत्यादी किडींच्या नियंत्रणासाठी फळभाज्या पिकामध्ये पिवळे चिकट कागदाचे सापळे बसवावेत. कोकणातील वाढलेल्या थंडीत आंबा आणि काजू पिकांचे व्यवस्थापन करावे, असे कोकण कृषी विद्यापीठाकडून सांगण्यात आले. काही ठिकाणी आंबा मोहोर नुकताच फुलत असून, काही ठिकाणी फलधारणा होत आहे. त्यामुळे या कालावधीत कीटकनाशकांची फवारणी शक्यतो टाळावी, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे. ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे आंबा पिकावर तुडतुड्यांची पैदास मोठ्या प्रमाणात होत आहे. तुडतुड्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्यास कीटकनाशकाची फवारणी करण्यात यावी यासाठी पोपटी रंगाच्या पालवीवर आणि मोहोर फुलल्यानंतर कणी अवस्थेत असताना औषध फवारणी करावी.
ढगाळ वातावरण व वाढलेल्या आर्द्रतेमुळे आंबा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. फूल किडीचा प्रादुर्भाव आंब्याच्या मोहोरावर व फळांवर दिसून येण्याची शक्यता आहे. ही कीड आकाराने सूक्ष्म असल्याने डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. या किडीचे प्रौढ पिवळे अथवा गडद चॉकलेटी रंगाचे तर पिल्ले पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे असतात. किडीची पिल्ले आणि प्रौढ पाने, मोहोर, कोवळे दांडे आणि फळावरील साल खरवडून त्यातून पाझरणारा रस शोषून आपली उपजीविका करतात. कोवळ्या सालीचा भाग खरवडल्यामुळे तो भाग काळा पडतो. मोहोर काळा पडून गळून पडतो.