राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होताना दिसत आहे, हळूहळू राज्याची सर्व क्षेत्रांची अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू व्हायला लागली आहे. राज्यातील शैक्षणिक संस्था ४ ऑक्टोबरपासून तर ७ ऑक्टोबर घटस्थापनेच्या मुहूर्तावर सर्व धर्माची धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला होता.
कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेचा मुकाबला करताना मार्चच्या दुसऱया आठवडय़ात नाटय़गृहे, चित्रपटगृहे व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. कोरोना संक्रमितांची संख्या कमी होऊ लागल्याने राज्य सरकारने टप्प्याटप्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लावलेले निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आयोजित चित्रपट क्षेत्र व रंगकर्मीच्या बैठकीत थिएटर्स उघडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राज्य सरकारने आता राज्यातील नाटय़गृहे व चित्रपटगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे सर्व रंगकर्मी व चित्रपट- नाटय़ रसिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील चित्रपटगृहे आणि नाटय़गृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात आली असून, यासंदर्भातील सविस्तर कार्यपद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
हळू हळू कोरोनाचे संपुष्टात येणारे प्रमाण लक्षात घेता, राज्यासाठी हि नक्कीच दिलासाजनक बातमी आहे. त्यामुळे अनेक गोष्टी २ वर्षानंतर का होईना, पण पूर्ववत व्हायला सुरुवात झाली आहे. कोरोना काळात चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित करण्यात आले, परंतु, नाट्य रसिकांसाठी कला दालन खुली झाल्याने प्रत्यक्ष आनंद घेता येणे शक्य होणार आहे.