शिवसेनेत बंड पुकारल्यापासून शिवसेनेतील नेते आणि बंडखोरांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातून या दोन्ही गटांतील वाद विकोपाला गेल्याचे दिसत आहे. परंतु बंडानंतरच्या पहिल्या काही दिवसांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्यांवर काहीही न बोलण्याची भूमिका शिंदे यांनी घेतली होती. ठाकरे अथवा कुटुंब यांच्याबाबत वैयक्तिक टीका केली जाणार नसल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही जाहीर केले होते. तरीही, आदित्य हे राज्यात फिरत असताना बंडखोरांवर हल्लाबोल करतच आहेत. त्यातही, ‘गद्दारांनो, राजीनामा देऊन निवडणुका सामोरे जा,’ असे आवाहन आदित्य यांनी केले आहे.
बंडखोरीनंतर ठाकरे कुटुंबीयांबाबत आक्रमक न होण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेऊनही काही आमदार हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेत असल्याची बाब शिंदे यांनी गांभीर्याने घेतली आहे. आपल्या गटातील आमदारांना आवरण्यासाठी ‘नको त्या विषयात नको तेवढे बोलू नका,’ असे बजावत शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
राज्यात दौरा करून बंडखोरांवर शाब्दिक हल्ल्याचे शस्त्र उचलणाऱ्या आदित्य ठाकरे आणि काही बंडखोर आमदारांमध्ये चांगलीच जुंपल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यातून ठराविक आमदार तर आदित्य यांच्यावरच निशाणा साधत आहेत. त्याआधी शिंदे यांना सुरक्षा पुरविण्यावरून देखील काही आमदारांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आपले मोजके आमदार हे रोज वादग्रस्त बोलत असल्याच्या तक्रारी काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यावर शिंदे यांनी बेजबाबदारपणे बोलणाऱ्या आमदारांचे कान टोचल्याचे समजते. त्यामुळे, शिंदे यांच्या शब्दापलीकडे नसलेले हे आमदारही आता एक पाऊल पाठी येण्याची चिन्हे दिसून येत आहेत.