राजापूर शहरातील चिंचबांध येथील पुरातन वास्तू सूर्यमंदिर नसल्याचा अहवाल दिल्ली पुरातत्त्व विभाग व राजापूर नगरपालिकेने दिला आहे. या पुराव्यांवर आधारितच विधानपरिषदेत उत्तर देण्यात आले असून, त्याचा विपर्यास करून नाहक बदनामीचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत, असा आरोप पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, ती १० ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राजापुरातील पुरातन वास्तू सूर्यमंदिर आहे का, यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपरोक्त खुलासा केला. ते म्हणाले, आपणही हिंदू आहोत आणि आपल्या धर्माचा अभिमान बाळगतो.
मात्र, कोणतीही शंका असेल तर चर्चा करून सत्य जाणून घेण्याचा मार्ग स्वीकारावा. त्याऐवजी निषेधाचा ठराव करणे हे योग्य नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, ती १० ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करणार आहे. या समितीत सर्व संबंधित विभागांसह सकल हिंदू समाज आणि वक्फ बोर्डाचे प्रतिनिधी असणार आहेत. जर वास्तू सूर्यमंदिर असल्याचे पुरावे आढळले, तर त्याबाबत कोणालाही आक्षेप असण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गंगातीर्थ विकास कामातही मदत करा – राजापुरातील श्री देव धुतपापेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे. कशेळीतील कनकादित्य मंदिराच्या सुशोभीकरणासाठी ७५ लाखांचा निधी आमदार किरण सामंत यांनी उपलब्ध केला आहे. गंगातीर्थ विकासासाठीही एक कोटी रुपये निधी दिला आहे. गंगातीर्थ विकास कामात जो अडथळा येत आहे, तो दूर करण्यासाठी अशा मंडळींनी प्रयत्न केले असते, तर ते चांगले झाले असते. त्यामुळे आपल्याला कुणी हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही, असे सामंत यांनी सांगितले.