राज्य सीईटी कक्षातर्फे आयोजित विविध अभ्यासक्रमांसाठीच्या १९ प्रवेश परीक्षा आजपासून रत्नागिरीत सुरू झाल्या; मात्र शासकीय फार्मसी कॉलेज येथील परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक उशिरा पोहोचल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये चलबिचल सुरू होऊन केंद्रावर गोंधळ निर्माण झाला. मुलांचे नुकसान होण्याच्या भीतीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधण्यात आला. डॉ. सामंत यांनी तत्परता दाखवत सीईटी कमिशनरशी संपर्क साधून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुरेसा वेळ घेऊन परीक्षा दिली. रत्नागिरीतील शासकीय फार्मसी कॉलेज येथे सीईटी परीक्षेसाठी केंद्र निश्चित करण्यात आले होते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे १०० हून अधिक विद्यार्थी पहाटे ५ वाजल्यापासून या केंद्रावर पोहोचले होते. सकाळी ७:३० ते ८:३० या वेळेत विद्यार्थ्यांना केंद्रावर नोंदणी करायची होती आणि ९ वाजता परीक्षेला सुरुवात होणार होती; परंतु सव्वाआठपर्यंत केंद्रावर एकही पर्यवेक्षक उपस्थित नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये अस्वस्थता पसरली.
ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे; मात्र पर्यवेक्षकांच्या अनुपस्थितीमुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक चिंताग्रस्त झाले. अखेर सव्वाआठ वाजता पर्यवेक्षक धावत-पळत केंद्रावर पोहोचले आणि साडेआठ वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. ९ वाजता परीक्षा सुरू झाली; परंतु या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि मानसिक स्थैर्य यावर परिणाम झाला. या गोंधळाची माहिती पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ सीईटी कमिशनरशी संपर्क साधला. त्यांनी कमिशनरना स्पष्ट सूचना दिल्या की, कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी आणि सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देण्यात आला व विद्यार्थ्यांनी लॉगिन केल्याच्या पुढे त्यांचा वेळ मोजण्यात आला.