रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव काळात येणाऱ्या चाकरमान्यांना जर लसीचे दोन डोस झाले नसतील तर प्रवेश करताना एकतर कोरोना चाचणीचा अहवाल अथवा ज्या गावात येणार तेथे चाचणी करावी लागेल असे निर्बंध घालण्यात आले होते. परंतु, आता कोरोना चाचणी करणे बंधनकारक नसल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
जिल्हाधिकारी रत्नागिरी डॉ. ब़ी.एन.पाटील यांनी ऍन्टीजन,आरटीपीसीआर चाचणी करूनच जिल्ह्यात प्रवेश करावा असे सांगितले होते. त्याप्रमाणे सूचना देखील ग्रामकृतीदलाला देण्यात आल्या होत्या. मात्र या निर्णयानंतर चाकरमानी दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी वादग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली दिसली. चाचण्यांसदर्भात गावपातळीवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
या संदर्भातील नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी विश्रामगृहावर नाम. सामंत यांनी पत्रकार परिषद घेवून जिल्हा प्रवेशासाठी करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणी संदर्भातील संभ्रम दूर केला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे सक्तीचे नसून केवळ खबरदारी म्हणून चाकरमानी अॅण्टीजेन टेस्ट करु शकतात. आरटीपीसीआर केली नाही म्हणून कोणीही चाकरमान्यांना गावामध्ये अडवणार नाही असे सांगितले.
आता जिल्हा प्रवेशासाठी कोरोना चाचणी बंधनकारक नसल्याने, चाकरमानी आता आपल्या गावामध्ये विना अडथळा प्रवेश करू शकतात असे त्यांनी सांगितले. त्यामुळे कोणत्याही चाचणी सक्तीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असेही सामंत यांनी सांगितले. कोरोनाचे नियम पाळून, गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी त्यावेळी केले.