मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे शुक्रवार पासून आमरण उपोषण सुरु झाले असून त्यांना साथ देण्यासाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत.
जणू रसद तोडण्यात आली! – आंदोलनाचा शुक्रवार पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी मुंबईत आलेल्या या लाखो मराठा आंदोलकांची फार मोठी तारांबळ उडाली. केवळ परिसरातीलच नव्हे तर दक्षिण मुंबईतील एकजात हॉटेल्स बंद होती. वडापावची गाडीही नव्हती.. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बंद करण्यात आली होती, टॉयलेटसना टाळे ठोकलेले होते, मैदानावर जेवण बनवून खाण्यावर बंदी होती.. जणू मुंबईत आलेल्या मराठ्यांची अन्नपाण्याची रसद तोडण्यात आली असावी.. त्यामुळे मराठा आंदोलकांचे फार मोठे हाल झाले.
इंग्रजांपेक्षाही क्रूर ! – दिवसभर मराठा आंदोलकांना अन्नपाणी मिळाले नाही. हे सर्व मराठा आंदोलकांना डिवचण्यासाठी केल्याचा आरोप शुक्रवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी केला. हे सरकार इंग्रजांपेक्षाही क्रूर वागते आहे अशा शेलक्या शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
असले धंदे करु नका ! – त्यांनी सांगितले, “मराठा बांधवांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. अहो, फडणवीस आमच्या इकडे सभा घ्यायला आल्यानंतर आम्ही अशीच वागणूक देतो का? कोणत्याही पक्षाचा नेता असला तरी तो मराठ्यांचाच कार्यकर्ता आहे. तुम्ही असं वागणार असाल तर आम्हीही बदला घेऊ.. असले धंदे करु नका, आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर आपण पाणी देतो पण इथे जाणीवपूर्वक हाल करण्यात येत आहेत” अशा शेलक्या शब्दात त्यांनी आपली तीव्र भावना व्यक्त केली.
भाजी, भाकरीचा ओघ ! – यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, “लासलगाव येथून भाजी भाकऱ्या घेऊन शनिवारी ट्रक येणार आहेत. मुंबईत गेलेल्या मराठ्यांची झालेली ही अवस्था समजताच संतापाची तीव्र लाट उसळली. ग्रामीण महाराष्ट्रातील मराठा समाजाने मुंबईत गेलेल्या मंडळींच्या अडचणी जाणून घेतल्या आणि मग संपूर्ण राज्यातून भाजी, भाकरीचा ओघ मुंबईत सुरु झाला. एका मागोमाग एक भाजी, भाकरीच्या गाड्या घेऊन मुंबईत मदत येवू लागली.”
मदतीच अखंड ओघ ! – मदतीचा ओघ सुरुच आहे. कुणी ५००० पाण्याच्या बॉटल्स पाठवत आहेत तर कुणी चटणी, भाकरी व चपात्या पाठवत आहेत. काहींनी फळांचे ट्रक भरुन पाठविले तर काहींनी मराठा आंदोलकांसाठी खिचडीचे टोप भरुन पाठवले. लाखोंच्या संख्येने पाण्याच्या बाटल्या आंदोलकांसाठी पाठवण्यात आल्या. मुंबईत गेलेल्या मराठा आंदोलकांना काहीही कमी पडू नये यासाठी खेड्यातला मराठा समाज जीवापाड प्रयत्न करीत आहे.
पोलिसांना पूर्ण सहकार्य – याही परिस्थितीत जरांगे पाटीलांच्या सर्व सुचना मराठा आंदोलक तंतोतंत पाळत आहेत. आपल्यामुळे कुठल्याही सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास होणार नाही याची सर्वजण काळजी घेत आहेत. एवढी प्रचंड संख्या असूनही कुठेही दादागिरी, दमदाटी वा अडवाअडवी होत नाही. पोलिस प्रशासनालाही पूर्ण सहकार्य केले जात आहे. मराठ्यांचे २५-२५ लाखांचे मूक मोर्चे निघाले त्यावेळी जी शिस्त होती तीच शिस्त, संयम व शांततेत हे आंदोलन सुरु आहे.
मराठा आंदोलकांचा निर्धार – मुंबईतील आझाद मैदान, छ. शिवाजी टर्मिनस, नरीमन पॉईंट, गेट वे ऑफ इंडिया, विधान भवन, कुलाबा, हुतात्मा चौक, बॅलॉर्ड पिअर आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर गजबजून गेला आहे. जिकडे तिकडे फक्त मराठा बांधव दिसत आहेत. प्रत्येकजण एकमेकांची काळजी घेत आहे. कितीही त्रास सहन करु, उपाशी राहू, कुठेही झोपू पण जरांगे पाटीलांना साथ देऊन शेवटपर्यंत मुंबई सोडणार नाही असा सर्वांचा निर्धार आहे!