कोरोना महामारीमुळे सर्वच व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. ऑनलाईन खरेदी, पेमेंटच्या माध्यमातून अनेक गैरव्यवहार झालेले सुद्धा उघडकीस आले आहेत. पोलीस प्रशासन अनेक वेळा नागरिकांना सतर्क करत असूनदेखील अनेक लोक, विद्यार्थी अशा भूलथापांना बळी पडतात. अनेक वेळा आर्थिक हानीचा बाका प्रसंग देखील उभा राहतो. मग पोलिसांशी संपर्क साधला जातो. कोरोना काळात तर सायबर गुन्ह्यांमध्ये अधिक प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून फसवणूक करण्यात आल्याच्या एकूण ५६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारी दाखल केल्यानंतर निव्वळ सात दिवसामध्ये तपास करून, आरोपीवर कडक कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावर एखाद्या फेक अकाउंट उघडून, पैसे मागितले जातात, अनेकजण फसतात देखील त्यामध्ये. आर्थिक नुकसानी बरोबर, संबंधित व्यक्तीची विविध प्रकारे बदनामी करण्याचे प्रकार देखील वाढत आहेत.
२०१६ सालापासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्वतंत्र सायबर स्थानकाची स्थापना करण्यात आली आहे. सायबर सेलकडे येणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी १ पोलीस अधिकारी व ५ अंमलदारांची टीम तिथे कार्यान्वित आहे. गेल्या तीन वर्षांत सायबर क्राईमच्या ५६ तर सहा महिन्यात सोशल मीडियावरील बनावट अकाउंटच्या २३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. सायबर पोलिसांनी आत्तापर्यंत १८ बनावट अकाउंट बंद केली आहेत. आणि उरलेल्या ५ तक्रारींवर अद्याप कारवाई सुरू आहे. पोलीस एवढ अशा कोणत्याही फेक कॉल्सना उत्तर देऊ नका सांगतात, तरीही अशिक्षित लोकांसोबत सुशिक्षित लोक सुद्धा अशा थापांना बळी पडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांबद्दल साक्षरता आणि जागरुक्रता निर्माण व्हावी, यासाठी “सायबर एहसास” या उपक्रमाचा संपूर्ण जिल्ह्यात आरंभ केला आहे.