कोकणातील महत्त्वपूर्ण अशा समजल्या गेलेल्या, संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अशा दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक निकालाच्या वेळेला कोरोना निर्बंध झुगारून जमाव करून, जल्लोष घोषणाबाजी व मिरवणूक काढल्यामुळे नव निर्वाचित आठ नगरसेवकांसह सुमारे दीडशे नागरिकांवर दापोली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली तालुक्यात नगरपंचायत निवडणुकीत विजय झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करत असताना तोंडाला मास्क न लावल्यामुळे १५० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या कोरोना बाबतच्या आदेशाची पायमल्ली केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. १९ जानेवारी रोजी झालेल्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक निकाल सीआरपीसी १४९ प्रमाणे नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याबाबत दापोली पोलीस ठाणेमार्फत दापोलीतील नगरपंचायत निवडणुकीतील उभे राहिलेल्या उमेदवारांना नोटीस देण्यात आलेली होती.
तरीही तहसीलदार कार्यालय समोर कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, विजयोत्सव साजरा करून घोषणाबाजी करत असताना तोंडाला मास्क न लावल्याप्रकरणी खालिद अब्दुल रखांगे, मेमन अरिफ गफूर, विलास राजाराम शिवगण, मेहबूब कमरुद्दीन तळघरकर, रविंद्र गंगाराम शिरसागर, अनवर अब्दुल गफूर रखांगे, संतोष दत्ताराम कलकुटके, अजीम मोहम्मद चिपळूणकर अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या नगरसेवकांची नावे आहेत व इतर दीडशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
निवडणूक निकाल काळामध्ये तिथे नेमण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्त अधिकारी व अंमलदार यांच्या मार्फत कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत समज सुद्धा देण्यात आली होती परंतु, त्यापैकी कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे बंदोबस्ताला असलेल्या अंमलदार यांच्यामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांनी या जमावाचे आणि कोरोना नियम पायदळी तुडविणार्यांचे व्हिडीओ शुटींग केले.
दापोली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणकीमध्ये एकत्र जमा होऊन विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. याप्रकरणी दापोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सुहास पाटील यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.