एकीकडे एसटी महामंडळ पुन्हा एकदा १० टक्के भाडेवाढ करण्याच्या मार्गावर असताना कर्मचाऱ्यांची भरतीही लवकरच होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान यावेळी तरी कोकणी मुलांवर अन्याय करु नका. चालक-वाहक भरतीपेक्षा दोन स्वतंत्र भरत्या करा. म्हणजेच चालकांची आणि वाहकांची वेगळी भरती करा, अशी मागणी कोकणी जनतेतून करण्यात येत आहे. २०१४ मध्ये युती सरकार सत्तेवर आल्यानंतर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी चालक वाहक भरती सुरु केली. म्हणजेच चालक हाच वाहक आणि वाहक हाच चालक असे हे पद निर्माण केले. मात्र विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र येथील तरुणांना याचा फायदा झाला. कोकणातून चालक अल्पप्रमाणात निर्माण होतात. आता या पदामुळे ज्यांना वाहन चालवता येत नाही त्यांना वाहकही होता येत नाही. त्यामुळेच चालकांची भरती वेगळी करा आणि वाहकांची भरती वेगळी करा अशी मागणी कोकणी जनतेतून होत आहे. आतापर्यंत ज्या भरत्या झाल्या त्यामध्ये कोकणी तरुणांवर अन्यायच झाला आहे.
कोकणतर भागातून भरतीसाठी येणारे उमेदवार वर्षभरानंतर आपापल्या गावात, तालुक्यात बदली होऊन जातात. आतापर्यंत ५० टक्के कर्मचाऱ्यांनी अशाप्रकारे बदल्या करुन घेतल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चालकांचेही शॉर्टेज होते आणि वाहकांचेही. मग नव्याने भरती होते. चालक कम वाहक ही भरती पुन्हा झाली तर कोकणातील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेही तरुण भरती होणार नाहीत हे त्रिवार सत्य आहे. त्यामुळे एस.टी. प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा अशी कळकळीची विनंती कोकणातील जनतेतून होत आहे.