सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी कुंभार्ली घाटाला सोनपात्र घाट असे नामांतर करून सोनबा धनगर बांधवांच्या बळीदानाला न्याय द्यावा अशी समस्त कोकण धनगर समाज बांधवांच्या वतीने महाराष्ट्र शासनाला विनंती करण्यात आली आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभार्ली घाट हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. हा घाट इंग्रजांच्या राजवटीत तयार करण्यात आला असून या घाटाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. इंग्रज अधिकारी सतत दोन वर्षे कुंभार्ली घाट रस्ता तयार करण्यासाठी पाहाणी करत होते परंतु त्यांना योग्य घाटाचा मार्ग सापडत नव्हता. ही बाब या कुंभार्ली घाटात शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी येणारे सोनबा धनगर बांधव पाहात होते. न राहून त्यांनी एकेदिवशी इंग्रज अधिकाऱ्यांना विचारले कि तुम्हाला मी दोन वर्षे या विभागात पाहात आहे त्यावेळी आम्हाला या घाटातून कोकणात जाणारा रस्ता तयार करावयाचा आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानी सोनबा धनगर बांधवांने मी रस्त्याचा मार्ग दाखवतो असे सांगून प्रत्यक्षात सुयोग्य असा मार्ग दाखवला.
इंग्रज अधिकाऱ्यांना पाहिजे तसा मार्ग सापडल्याने तेही सोनबा धनगर बांधवांवर खुश होऊन तुला आम्ही काय इनाम देऊ असे विचारले असता मी धनाचा धनगर आहे. तुम्ही मला काय इनाम देणार, मीच तुम्हाला इनाम देतो असे स्वाभिम ानाने सांगितले. सोनबा धनगराचा स्वाभिमान पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना राग आला व त्यांनी तेथेच सोनबा धनगर बांधवाचा गोळ्या घालून वध केला. असा हा कुंभार्ली घाटाचा रक्तरंजित इतिहास आहे. कुंभार्ली घाटांत सोनबा धनगर बांधवांचे मंदिर बांधण्यात आले आहे. ज्या कारणासाठी सोनबा धनगर बांधवाने आपले बलिदान दिले आहे त्यांचा इतिहास पुढील पिढीला माहीत असणं गरजेचं आहे. सोनबा धनगर हे फक्त धनगर समाजाचे आदर्श नसून संपूर्ण कोकणवासीय सर्व समाज बांधवांचे प्रेरणास्थान आहे, असे सम ाजसेवक रामचंद्र बाबू आखाडे यांनी म्हटले आहे.