गुहागर तालुक्यातील वेळंब ग्रामपंचायतीच्या केलेल्या कामाचे रनिंग बिल काढण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप असलेले गुहागर पंचायत समितीमधील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय सळमाखे यांना मंगळवारी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरीच्या पथकाने पत्रकारांना दिली. संशयित आरोपी सळमाखे यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. गुहागर तालुक्यातील वेळंब ग्रामपंचायतीच्या पत्रा शेडच्या काम ांतर्गत ३.५ लाख रु.चे रनिंग बिल काढण्यासाठी ७ हजार रुपयाची लाच मागितली अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. शुक्रवारी काम करणारा उप ठेकेदार यांना संबंधित कागदपत्रावर सही करण्यास नकार दिला. दोन वेळा केबिनच्या बाहेर पाठवले. हे रनिंग बिल आहे शेवटचं बिल काढताना कोणतेही रक्कम देऊ नको पण मला आता कोणताही परिस्थितीत ७००० रुपये दे अशी मागणी उप अभियंतां सळमाखे यांनी तक्रारदार यांच्याकडे केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
संबंधित तक्रारदार यांनी शुक्रवारीच लाच लुचपत विभाग यांच्याजवळ संपर्क साधून संपूर्ण हकीगत सांगितली. त्यानंतर मंगळवारी लाच लुचपत विभागाने सापळा रचला. तक्रारदार फोटोवर राहिलेली सही घेण्यासाठी कार्यालयात गेला असता उप अभियंता सळमाखे यांनी पुन्हा एकदा कागदपत्रावरील ग्रामसेवकाची सही नाही असे सांगून बाहेर काढले. मात्र ग्रामसेवकाची सही आणल्यानंतर रक्कम आणली का हे विचारून रुपये ५ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यांना अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. याबाबत मंगळवारी रात्री उशीरापर्यंत पुढील कार्यवाही सुरु होती.

