अनेक वर्षांपासून रखडलेल्या मिरकरवाडा बंदराचा विकास एमआयडीसी आणि बंदर विभागाकडून होणार आहे. त्या अनुषंगाने आराखडा तयार करण्यात येणार आहे. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचा मरिनड्राईव्हच्या धर्तीवर पर्यटन विकासासाठी ४१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. साखरीनाटे आणि हर्णे बंदराच्या विकासासाठी प्रत्येक २०६ कोटी मंजूर झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी दौऱ्यावर असताना पत्रकारांशी झालेल्या चर्चेवेळी त्यांनी ही माहिती दिली.
मिरकरवाडा बंदर विकासाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ७० कोटींचा निधी मंजूर झाला. या निधीतून बंदराचा विकास करण्यात आला; परंतु बहुतांशी निधी हा बंदरातील गाळ काढण्यासाठीच खर्च झाला. मच्छीमारांसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा दुसऱ्या टप्प्यात होणार होत्या; परंतु दुसऱ्या टप्प्याला निधीच मंजूर झाला नाही. त्यानंतर सागरमाला योजनेतून या बंदराचा विकास होणार होता तो प्रस्तावही मागे पडला. एमआयडीसी आणि बंदर विभागाच्या माध्यमातून मिरकरवाडा बंदराचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे.
त्यामुळे या बंदराच्या रखडलेल्या विकासाला वेग येईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. त्याचबरोबर साखरीनाटे आणि हर्णे बंदराचाही विकास होणार आहे. त्यासाठी प्रत्येक २०६ कोटी रुपये मंजूर आहेत. दरम्यान, धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम वेगाने सुरू आहे. ८० टक्के या बंधाऱ्याचे काम झाले आहे. सुमारे सव्वाशे कोटीचे हे काम आहे. या बंधाऱ्याचे काम करताना मरिनड्राईव्हप्रमाणे करण्याची संकल्पना मंत्री उदय सामंत यांची आहे.