राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्तधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यामुळे भाजपच्या सदस्यांनी विधानसभेमध्ये गोंधळ घालायला सुरुवात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी तीव्र आक्षेप नोंदवत भास्कर जाधव यांच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली.
पंतप्रधानांविषयी अशाप्रकारे अंगविक्षेप करुन बोलताना लाज वाटली पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांना सुनावले. यासाठी भास्कर जाधव यांनी माफी मागितलीच पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी लावून धरली. सभागृहात चर्चा सुरु असताना नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात मिळणाऱ्या १५ लाखांच्या आश्वासनाचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी, नरेंद्र मोदी असे कधीच बोललेले नाहीत, असा दावा केला. त्यावर भास्कर जाधव यांनी जागेवर उभे राहत नरेंद्र मोदी यांच्या बोलण्याच्या लकबीमध्येच शारीरिक हालचाली करत त्यांचीच वाक्य बोलून दाखवली, हे पाहून देवेंद्र फडणवीस हे प्रचंड संतापले.
त्यांचा पारा एवढा चढला कि, सभागृहात देशाच्या पंतप्रधानांची नक्कल करणे, हे योग्य नव्हे. भाजपचे सर्व त्यांच्यावर शाब्दिक तुटून पडले. सभागृहात अशा प्रकारचा कोणताही पायंडा पडता कामा नये, प्रत्येक पक्षाच्या नेत्याचा मान हा ठेवलाच गेला पाहिजे असे फडणवीस यांनी म्हटले. मात्र, त्यानंतरही भास्कर जाधव काही केल्या ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. जाधव यांनी सांगितले कि, नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य २०१४ साली पंतप्रधान होण्यापूर्वी केले होते. त्यामुळे मी पंतप्रधान नव्हे तर भाजपच्या उमेदवाराची नक्कल केली, असा एकवेळ त्याचा अर्थ होऊ शकतो असे सांगितले. यानंतरही भाजपच्या आमदारांनी गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज काही काळापुरते बंद पाडले. मग त्यावरून भास्कर जाधव यांनी मी माझे शब्द आणि अंगविक्षेप मागे घेतो, असे म्हटले.
मात्र, अंगविक्षेप मागे घेण्याचे कोणतेही आयुध उपलब्ध नाही. भास्कर जाधव अजूनही हा विषय थट्टेत घेत आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी आपल्या पदाचा आणि अधिकारांचा वापर करुन त्यांची योग्य जागा दाखवावी. पंतप्रधानांचा असा अवमान केला जाणार असेल तर, हक्कभंग आणला जाईल, आणि मी तो आणणारच. जाधवांनी अंगविक्षेप केल्याचं मान्य केलं आहे तर त्यांनी माफी मागितली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. त्यानंतरही सभागृहात गदारोळ सुरुच राहिल्याने विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याचे सांगितले. त्यावर जाधव म्हणाले कि, मी काहीही माझ्या मनाचे बोललेलो नाही, जे मान. पंतप्रधान म्हणाले तेच बोललो. परंतु, विधानसभेचे कामकाज बंद पडू नये यासाठी मी बोललेल्या वक्तव्याची मी बिनशर्थ माफी मागतो.