मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीसाठी खुल्या झालेल्या दुसऱ्या बोगद्यात विद्युतीकरणासह अंतर्गत कामे प्रगतिपथावर आहेत. बोगद्यापासून काही अंतरावर पुलाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी जादा मनुष्यबळ तैनात केले आहे. बोगद्यात वेगदर्शन डिजिटल यंत्रणाही बसविण्यात येणार असल्याची माहिती आहे. वर्षअखेरीस दुसरा बोगदा वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होईल, असे संकेत राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून देण्यात आले आहेत. कशेडी बोगद्यातून प्रवास वेगवान झाला असून ४८ मिनिटांचे अंतर अवघ्या ८ मिनिटांतच पार करणे शक्य झाले आहे. मात्र, दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी खुले झाल्यापासून चर्चेचा विषय ठरले आहेत. कशेडीच्या पहिल्या बोगद्यातून दोन्ही दिशांकडील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने वाहनचालकांचा प्रवास वेगवान झाला आहे. वाहनचालकांच्या वेळेची बचत होत असल्याने सर्वच वाहनचालक बोगद्यातूनच मार्गस्थ होण्यास पसंती देत आहेत. कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यातील वाहतूक २० सप्टेंबरपासून बंद केली आहे.
दुसऱ्या बोगद्यात विद्युतीकरणाच्या कामासह पाण्याचा योग्य तन्हेने निचरा होण्यासाठी गटारे व अंतर्गतकामे अजूनही अपूर्णावस्थेत आहेत. याशिवाय गर्डरसह संरक्षक कठडे उभारण्याची कामे प्रलंबित आहेत. दुसऱ्या बोगद्यातील विद्युतीकरणाचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. बोगद्यापासून काही अंतरावर पूल उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्यादृष्टीने ५० हून अधिक कामगारांची फौज राबत आहेत. कशेडीचा पहिला बोगदा नानाविध समस्यांच्या गर्तेत अडकला होता. याची पुनरावृत्ती दुसऱ्या बोगद्यात होणार नाही. याची पुरेपूर दक्षता राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून घेण्यात येत आहे. बोगद्यातून वाहनचालकांचा प्रवास वेगवान होत असला तरी वाहतूक नियंत्रणासाठी बोगद्यात वेग दर्शन डिजिटल यंत्रणा बसवण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग खात्याने घेतला आहे.
लवकरच ही यंत्रणा बसवण्याचे काम देखील हाती घेण्यात येणार आहे. दुसऱ्या बोगद्यातील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आणखी दीड महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे वर्षअखेरीस कशेडीचा दुसरा बोगदाही पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होईल, असे सांगण्यात येत आहे. दुसरा बोगदाही वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर दोन्ही बोगद्यातून दोन्ही दिशांकडील वाहनचालकांचा प्रवास आणखी गतिमान आणि आरामदायी. होणार आहे. यामुळे वाहनचालकांच्या वेळेची तितकीच बचत होणार आहे. कशेडी घाटातून तुरळक वाहने कशेडीच्या पहिल्या बोगद्यातून दोन्ही बाजूकडून प्रवास करण्यास वाहनचालक मुभा देत आहेत.
कशेडी घाटातील वाहतूक रोडावली – बोगद्यातून वाहतूक सुरू झाल्याने कशेडी घाटातून तुरळक वाहने धावत असल्याचे निदर्शनास येत आहे. घाटातील मार्गावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्रामस्थांच्या आग्रहामुळे नाईलाजास्तव काही बसेस कशेडी बोगद्यामार्गे धावत आहेत. काही एसटी बसेसचा अपवाद वगळता अन्य वाहने बोगद्यातूनच मार्गस्थ होत असल्याने घाटातील मार्गावर वाहनांची संख्या रोडावली आहे.